संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात   

वृत्तवेध 

‘मेक इन इंडिया’चा प्रभाव संरक्षण क्षेत्रात दिसू लागला असून भारत आता या क्षेत्रात स्वावलंबी होत आहे. याशिवाय संरक्षण निर्यातीतही तो विक्रम करत आहे. अलिकडेच संरक्षण मंत्रालयाने सांगितले की भारत आता लष्करी साहित्याच्या मोठ्या प्रमाणावर आयात अवलंबित्वातून स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे.
 
संरक्षण निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी दारूगोळा, शस्त्रे, उपप्रणाली आणि इतर संरक्षण उत्पादने ८० देशांमध्ये निर्यात केली गेली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच सांगितले की २०२४-२५ मध्ये भारताने २३ हजार ६२२ कोटी रुपयांच्या संरक्षण संबंधित वस्तूंची निर्यात केली आहे. त्यात दारूगोळा, गनपावडर, शस्त्रे आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.
 
परदेशातून वाढली मागणी
 
२०२४-२५ मध्ये केलेली संरक्षण निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.०४ टक्के अधिक आहे. परदेशात संरक्षण उत्पादनांची मागणी प्रचंड वाढली आहे. सरकार स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देत असून ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमुळे भारत जागतिक संरक्षण पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याव्यतिरिक्त २०२४-२५ मध्ये १,७६२ निर्यात ऑर्डर्स पूर्ण करण्यात आल्या, ज्या मागील वर्षाच्या तुलनेत १७.४ टक्के अधिक आहेत. यावरून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय संरक्षण उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते.
 
संरक्षण निर्यात पन्नास हजार कोटींवर
 
भारत २०२९ पर्यंत पन्नास हजार कोटी रुपयांचे संरक्षण निर्यातीचे लक्ष्य गाठणार आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार संरक्षण उत्पादनात गुंतवणूक वाढवत असून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देत आहे. त्याचप्रमाणे संरक्षण उद्योगात खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देत आहे. संरक्षण क्षेत्रातील ही वाढ स्वावलंबी भारत मोहिमेला अधिक बळकट करते आणि जागतिक संरक्षण बाजारपेठेत देशाला प्रमुख निर्यातदार म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरते.

Related Articles