वाचक लिहितात   

निसर्गापुढे माणूस हतबल
 
गतवर्षी मान्सूनपूर्व नुकसानकारक अशा अवकाळी पावसाळी संकटाचा मुकाबला फारसा करावा लागला नव्हता; परंतु यावर्षी मात्र अधूनमधून राज्यभर कोठे ना कोठे सोसाट्याच्या वादळी वार्‍यासह होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे, वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. आता आगामी काळातही मेघगर्जनेसह, वादळी वार्‍यांसह पावसाचे अनुमान वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे, वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे राज्यात काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले! पालेभाज्या उत्पादक शेतकर्‍यांनाही तसेच फळबागांनाही विशेष फटका बसला आहे. यावर्षी आंबा मोहोराने चांगलाच बहरला होता; मात्र आंबा पिकाला अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने सगळा विरस झाला आहे! निसर्ग आणि त्याच्या लहरीपणापुढे मानव खरेच हतबल वाटत आहे!
 
श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा) 
 
फटाक्यांवर बंदी हवी
 
गुजरातच्या बनासकांठातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यात १८ पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. बॉयलर फुटल्याने ही आग लागली. या कारखान्याबाबतीत धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी गोदामासाठी परवाना देण्यात आला होता; पण या फटाका साठा करण्याच्या गोदामामध्ये मात्र अनधिकृतपणे फटाके बनवले जात होते. त्यामुळे सरकारने संपूर्ण देशामध्ये फटाका निर्मितीवर बंदी आणावी. फटाक्यामुळे प्रदूषणाला बळ मिळते. 
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव 
 
औषधांच्या किमती स्वस्त हव्यात!
 
नियमित, दीर्घकाळ घेतल्या जाणार्‍या आणि जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अशा ९०० हून अधिक औषधांच्या किंमतीत नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाढ झाल्याने सामान्य, मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ मंडळींच्या चिंतेतही त्याच्या दुप्पट वाढ झाली असे म्हटल्यास ते खोटे ठरू नये. खरेतर शासनाकडून संबंधित यंत्रणांनी अशा अत्यावश्यक, दीर्घकालीन घ्याव्या लागणार्‍या औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा दृष्टिकोन, प्रयत्न करावयास हवा, तरच ज्येष्ठांसह, सर्वसामान्य मध्यमवर्गीय यांना दिलासा मिळेल, जगण्याची उमेद वाढेल.
 
विश्वनाथ पंडित, ठाणे
 
संयम आवश्यक
 
रविवार केसरी (दि. ६ एप्रिल) मधील बँकांमधील मराठी सक्तीचे आंदोलन मनसेने गुंडाळले, ही बातमी मनसेचा संदेश जनमानसात पोहोचल्याचा दावा सांगते. बँकांमध्ये देशभरातील कुठल्याही शाखेत अधिकार्‍यांच्या बदल्या ३-३ वर्षांनी होत असतात. परराज्यात मराठी कर्मचारीही जाऊ शकतात. तिथे रुळायला, तिथली भाषा आत्मसात करायला जो वेळ पाहिजे, त्यासाठी ३ वर्षांचा कालावधी पुरेलच असे नाही. शिवाय मराठी कर्मचारी महाराष्ट्रातीलच शाखांमध्ये फिरुन फिरुन अधिकारपदावर नेमले जातील अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अपेक्षित पात्रता सापडत नसेल, तर प्रशिक्षण देऊन ती निर्माण करायलाही काही अवकाश द्यावा लागेल. त्यामुळे आधीच मराठीविषयी महाराष्ट्रातील पालक-पाल्य यांपासून असलेली उदासीनता लक्षात घेता, परराज्यातून आलेल्यांना धाकदपटशा करून मराठी बोलायला लावणे, मराठी जनतेच्या कामकाजातच व्यत्यय आणेल आणि अराजकता पसरवेल हे ध्यानात घेऊन संयम बाळगावा, हे वेळीच लक्षात आले हे बरे झाले.
 
श्रीपाद कुलकर्णी, पुणे
 
इलेक्ट्रिक गाड्यांची चलती 
 
आज कोणत्याही गावात पहा अगदी रस्त्याच्या कडेलासुद्धा दुचाकी व चारचाकी लावलेल्या दिसून येतात. अनेक ठिकाणी प्रत्येक कुटुंबाच्या अगदी दोन-दोन कार आहेत. यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. दूषित वायूमुळे अनेक ठिकाणी मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मोठ्या शहरात तर लाखो वाहनांमुळे श्वसनाचे व इतर अनेक विकार निर्माण झाले आहेत. यावर इलेक्ट्रिक वाहने हा अलीकडच्या काळात मोठा उपाय आहे. यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे अलीकडे अशा गाड्या घेण्याचा वाढता कल लोकांचा वाढला आहे. ही खरी तर अतिशय चांगली घटना आहे. रस्ते व परिवहन मंत्रालयाने आपले उद्दिष्ट २ दशलक्ष एवढे ठेवले होते. इलेक्ट्रिक बाजारात ३० टक्के हिस्सेदारीसह ओला इलेक्ट्रिक अव्वल क्रमांकावर राहिली.
 
शांताराम वाघ, पुणे 
 
ई बाईक प्रवाशांसाठी उपयुक्त
 
वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाईक) टॅक्सी सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्रिमंडळाचा हा निर्णय योग्य आहे. ई बाईकमुळे नागरिकांना एक जलद व स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे. शिवाय हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. बेरोजगारी कमी होण्यासही मदत होणार आहे. ई बाईकमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

Related Articles