अखनूरमध्ये लष्करी अधिकारी शहीद   

अखनूर : जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. मात्र, या कारवाईत लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला, असे अधिकार्‍यांनी शनिवारी सांगितले.
 
शुक्रवारी रात्री उशिरा अखनूरच्या केरी बट्टल भागात ही चकमक झाली. सीमेपलीकडून पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. तर, दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने परत जाण्याचा इशारा दिला. त्यावर, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यास सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईत लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला. कुलदीप चंद असे या अधिकार्‍याचे नाव आहे. ते हिमाचल प्रदेशाचे रहिवासी होते. दरम्यान, भारतीय लष्कराच्या व्हाइट नाइट कॉर्प्सने शहीद जेसीओ कुलदीप चंद यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. याच भागात ११ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एका कॅप्टनसह दोन लष्करी जवान शहीद झाले होते.

Related Articles