हिमाचलमध्ये पूल कोसळल्याने वाहतूक विस्कळीत   

कुल्लू : हिमाचल प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग ३०५ वरील मंडी ते कुल्लू जिल्ह्याला जोडणारा पूल शनिवारी पहाटे  कोसळला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली, असे अधिकार्‍यांनी सांगितले. कुल्लू जिल्ह्यातील बंजार येथे १९८० च्या सुमारास बांधलेला पूल काल सकाळी अचानक कोसळला. त्यावेळी पुलावरून जाणारी मालमोटार नदीत कोसळली. यात चालक किरकोळ जखमी झाला, असे त्यांनी सांगितले.
 
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकास स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे कुल्लूचे पोलिस उपायुक्त तोरूल एस. रवनीश यांनी सांगितले. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पूल पूर्णपणे कोसळला आहे. त्यामुळे, पुढील काही दिवस हा मार्ग वाहतूकीसाठी बंद असेल, असेही ते म्हणाले.  मात्र, तोपर्यंत पर्यायी पुलाचे काम तातडीने हाती घेण्यात येईल, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles