सिंहगडावर परदेशी पर्यटकासोबत गैरव्यवहार करणार्‍यांवर गुन्हा   

पुणे : न्यूझीलंडवरून आलेल्या पर्यटकासोबत सिंहगड किल्ल्यावर गैरव्यवहार करणार्‍या चौघांवर हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परदेशी पर्यटकासोबत चार जण गैरवर्तन करत असल्याची चित्रफित समाजमाध्यमावर पसरली होती. त्यानंतर, शहरातील विविध पोलिस ठाण्यात नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या. हवेली पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार संतोष भापकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
 
न्यूझीलंड येथील एक पर्यटक ३ एप्रिल रोजी सिंहगड किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी गेला होता. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील आठ ते दहा तरुणांचा एक गट तेथे फिरण्यासाठी आला होता. ट्रेकदरम्यान एका लिंबू सरबतच्या स्टॉलजवळ थांबलेल्या चौघा आरोपींनी या न्यूझिलंडच्या पर्यटकांशी गप्पा मारल्या. त्यानंतर, त्याला मराठी येत नसल्याचे समजल्यानंतर त्याला मराठी भाषेतील आक्षेपार्ह शब्दांतील शिव्या म्हणायला सांगितल्या. मराठी भाषा येत नसल्याने या परदेशी पर्यटकानेदेखील त्या शिव्या म्हटल्या. या सार्‍या घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर पसरल्यानंतर गडकिल्ले प्रेमी, शिवप्रेमींनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, या सर्वांनी पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात त्या तरुणांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले. हवेली पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles