बिहारमधील नवी ‘घराणेशाही’   

राज्यारंग , शिवशरण यादव 

‘राणीच्या पोटी राजा जन्माला येत नाही’ हा समाजवाद्यांचा लाडका सिद्धांत केव्हाच मागे पडला. त्यांच्या राजकारणाचा आधार आता समाजवादी पक्षातील दिग्गज नेते बाजूला सारत आहेत. देवीलाल, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यासारखे समाजवादी नेते मार्गापासून दूर गेले आणि प्रत्येकाने आपल्या मुलाला आपल्या राजकारणाचा उत्तराधिकारी बनवले. आता नितीशकुमारही त्याच मार्गावरून चालले आहेत.
 
आतापर्यंत  घराणेशाहीला -परिवारवादाला-विरोध करणे हाच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजकारणाचा पाया होता; परंतु आता त्यांचे हे अस्त्रच निकामी ठरण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा आता राजकारणात प्रवेश करू पहात आहे. थकलेल्या नितीशकुमार यांचा आता पक्षातील नेत्यांवर विश्वास नसावा. त्यामुळे त्यांनी पक्षाची सूत्रे घरातील पुढच्या पिढीकडे देण्याचे ठरवले असून, परिवारवादावरून राजकारण करण्याचे नितीशकुमार यांचे हत्यार आता बोथट होणार आहे. बिहारमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. त्यात सक्रिय राजकारणाशी कोणताही संबंध नसलेला निशांत हा नितीशकुमार यांचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. हे चिरंजीव पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहेत असून आपल्या वडिलांना मतदान करून पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचे आवाहन जनतेकडे करत आहेत. नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे जाहीर करावे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन करावे, असेही ते म्हणत आहेत. अशात आतापर्यंत राजकारणापासून दूर असलेल्या निशांतकुमार यांच्या सक्रियतेमुळे संयुक्त जनता दलाच्या वारसदाराची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याकडे राजकीय पदार्पण म्हणून पाहिले जात आहे. 
 
पाटणा येथील संयुक्त जनता दलाच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले पोस्टरही हेच वास्तव दर्शवत आहे; मात्र हे पोस्टर पाटण्यातील एका काँग्रेस नेत्याने लावलेल्या पोस्टरला उत्तर असल्याचे सांगितले जात आहे. ज्यावर लिहिले होते, ‘राजाचा पुत्र राजा बनणार नाही, हरनौतच्या जनतेला पाहिजे तोच राजा बनेल’. निशांत यांनी  ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. निशांत यांना साधे जीवन आवडते. आतापर्यंत त्यांचा राजकारणापेक्षा अध्यात्माकडे विशेष कल होता.  यापूर्वी जेव्हाही त्यांना राजकारणात येण्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा ते स्पष्टपणे नकार देत होते. जुलै २०२४ मध्ये त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडल्याचे सांगून राजकारणात प्रवेश करण्याबाबतच्या अटकळींना नकार दिला; मात्र या वर्षी माध्यमांना सामोरे जाताना ते आपल्या वडिलांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करत असून राजकारणातील प्रवेशाबद्दल विचारले असता नाकारतही नाहीत.
 
बिहारच्या राजकीय वर्तुळात नितीशकुमार यांच्यानंतर पक्षाची सूत्रे कोणाकडे जाणार याची जोरदार चर्चा आहे. २००३ मध्ये पक्षाच्या स्थापनेनंतर माजी आयएएस अधिकारी आरसीपी सिंग, उपेंद्र कुशवाह आणि प्रशांत किशोर पक्षात उदयास आले. वेळोवेळी त्यांच्याकडे नितीश्श यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते; परंतु नितीशकुमार यांनी कधीही कोणत्याही नावाला मान्यता दिली नाही. वेळ  चालला, तसतशी नितिशकुमार यांच्या प्रकृतीबाबत विधाने ऐकायला मिळू लागली. तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर नितीश कुमार यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. नितीशकुमार यांचा उत्तराधिकारी म्हणून निशांत कुमार यांच्याकडे पाहिले जात असताना घराणेशाहीच्या राजकारणाला सतत विरोध करणारे नितीश खरोखरच आपल्या मुलाच्या राज्याभिषेकाची तयारी करत आहेत का, या एका प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.
 
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणतात की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही लोकांना निशांत यांनी कोणत्याही परिस्थितीत राजकारणात प्रवेश करावा असे वाटत नाही. भाजप प्रत्यक्षात संयुक्त जनता दलाला नष्ट करण्याचा कट रचत आहे. संयुक्त जनता दलाचे  काही नेते पूर्णपणे भाजपचे झाले असून निशांत राजकारणात आले, तर संयुक्त जनता दलाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे असे ते म्हणत आहेत.
 
बिहारचे एक मंत्री विजयकुमार चौधरी यांनी मात्र संयुक्त जनता दलामध्ये पुढे काय होणार हे नितीशकुमार ठरवतील. त्यांना अपेक्षित असणारेच पक्षाचे नेतृत्व करतील, असे म्हटले आहे.  काही निरीक्षक निशांतकुमार यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे नितीशकुमार यांची भाजपविरोधातील नवी राजकीय खेळी म्हणूनही पाहतात. कोलांत उड्या मारणारा  नेता अशी नितीश यांची ओळख आहे.. एक कारण असेही सांगितले जाते की नितीशकुमार आपल्या कमी होत चाललेल्या पाठिंब्याचा अंदाज घेतल्यानंतर निशांतकुमार यांच्या नावावर त्यांची लव-कुश व्होट बँक एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. नितीशकुमार यांना पुढच्या वेळी मुख्यमंत्री केले जाणार नाही, अशी भीती आहे. त्यामुळे निशांतकुमार यांचे नाव पुढे करून त्यांची मूळ मतपेढी  त्यांच्या पाठीशी राहील आणि भाजपने कोणतीही खेळी केल्यास ती  नाराज होईल, असा संदेश भाजपला देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निशांत यांना पुढे करणे हा पक्षांतर्गत संघर्ष आणि भाजपच्या वाढत्या वर्चस्ववादावर मात करण्याचा प्रयत्न असू शकतो. निशांत हे नालंदा जिल्ह्यातील हरनौत जागेवरून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. या मतदारसंघावर गेल्या चार निवडणुकांमध्ये संयुक्त जनता दलाने विजय मिळवला आहे. नितीशकुमार १९९५ मध्ये या जागेवरून विजयी झाले होते.
 
नितीश हे स्वत: घराणेशाहीच्या राजकारणाचे कठोर टीकाकार आहेत आणि त्यांनी यासंदर्भात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि लोकजनशक्ती पक्षावर  टीका केली आहे. निशांत यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे या पक्षांना मोठा दिलासा मिळणार, हे उघड आहे. त्यामुळे विरोधकही त्यांच्या निर्णयाची वाट पहात आहेत. अगदी गेल्या आठवड्यापर्यंत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवारवादाच्या राजकारणावर तुटून पडणार्‍या नितीशकुमार यांच्याच मुलाने राजकारणात प्रवेश केला, तर विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्याची आयती संधी मिळणार आहे. मात्र नितीशकुमार यांच्यानंतर केवळ निशांतकुमारच संयुक्त जनता दलाची धुरा सांभाळू शकतील आणि त्यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे पक्ष मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. आतापर्यंत खुद्द निशांतकुमार यांनी राजकारणात येण्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही; पण ताज्या पोस्टर्समुळे त्यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. 
 
त्याचबरोबर संयुक्त जनता दलातही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नेते निशांतकुमार यांच्या समर्थनात आहेत, तर काहींच्या मते हे कार्यकर्त्यांचे वैयक्तिक मत आहे. या सगळ्यामध्ये नितीशकुमार निशांत यांना इतक्यात राजकारणात येऊ देतील का, असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो; पण नितीशकुमार थकले आहेत आणि संयुक्त जनता दलाला वाचवायचे असेल तर निशांतला पक्षात आणावे लागेल, असे लोकांचे मत आहे. आज पक्ष समर्थकांची हीच विचारसरणी आहे. अशा स्थितीत निशांतचा बिहारच्या राजकारणात प्रवेश निश्चित दिसत आहे. 

Related Articles