नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा   

उत्तर पत्रिका उघड करण्याची मागणी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नोकरी गमावलेल्या हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी शुक्रवारी कोलकात्यात मोर्चा काढला. आरजी कार रुग्णालय आणि महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर जोरदार निदर्शने करण्यात आली होती. त्याच प्रमाणे शिक्षकांनी देखील काल मोर्चा काढून अन्यायाला वाचा फोडल्याचे मानले जात आहे.
 
पश्चिम बंगाल शिक्षण सेवा आयोगाच्या भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशानुसार राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची नियुक्ती रद्द केली होती. त्यामुळे काही दिवसांपासून राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिक्षकांचा मेळावा घेऊन त्यांच्या नोकर्‍यांना धक्का लागणार नाही, असे आश्वासनही नुकतेच दिले होते. 
 
या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी काल मोर्चा काढला. आम्हाला न्याय द्या, अशा घोषणा त्यांनी सॉल्ट लेक रस्त्यावर काढलेल्या मोर्चात दिल्या.  करुणामयी ते आचार्य सदन असा मोर्चा काढला होता. पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाचे कार्यालय आचार्य सदन येथे आहे. त्या परिसरात सर्वजण जमा झाले होते. शिक्षक, शिक्षकेत्तर भरतीसाठी २०१६ मध्ये परीक्षा घेतली होती. २२ लाख उत्तर पत्रिका (ऑप्टीकल मार्क रिकोग्नेशन) उघड करुन खरे उमेदवार कोण आहेत? याचा शोध घेण्याची मागणी या वेळी करण्यात आली. नियुक्तीत गैरप्रकार झाल्याचे उघड होताच सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार सर्वांची नियुक्ती रद्द केली होती. मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी विविध समाजसेवी संस्था निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले होते. 

Related Articles