किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार   

उधमपूरमध्ये शोधमोहीम सुरु

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. तर, उधमपूर जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, असे लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितले.किश्तवाडमधील चकमक छत्रू जंगल परिसरात घडली. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे संयुक्त पथक दहशतवादविरोधी मोहिमेवर होते. त्यावेळी, दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. प्रत्युत्तरदाखल कारवाईत एक दहशतवादी ठार झाला. या भागात शोध मोहीम सुरू आहे, असे लष्कराने ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
डोंगराळ भाग आणि प्रतिकूल हवामानातही जवान मोठ्या शर्थीने कारवाई करत आहेत, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी डोडा जिल्ह्यातील भदेरवाह भागात टेहळणी नाका उभारला आहे, असेही ते म्हणाले. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून किश्तवाड, उधमपूर आणि कठुआ परिसराला जोडणार्‍या भागावर लक्ष ठेवले जात आहे. कठुआ-उधमपूर-किशतवाडच्या डोंगराळ भागात मागील १९ दिवसांत पाच चकमकी झाल्या. यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले. तर, चार पोलिस कर्मचारी ठार झाले. शिवाय, तीन पोलिस कर्मचारी आणि एक मुलगी जखमी झाली.उधमपूर जिल्ह्यातील जोफर-मार्टा जंगलात काल पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. या भागात तीन दहशतवादी लपले आहेत. दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी या भागात रात्री नाकाबंदी करण्यात आली होती, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमोद अशोक नागपुरे यांनी सांगितले.

Related Articles