नजरकैदेत ठेवले; नमाज अदा करण्यापासूनही रोखले   

मीरवाइज उमर फारुक यांचा आरोप 

श्रीनगर : मला पुन्हा नजरकैदेत ठेवण्यात आले आणि जामा मशिदीत सामूहिक नमाज अदा करण्यापासून मला रोखण्यात आले, हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाइज उमर फारूक यांनी शुक्रवारी सांगितले. मीरवाइज हे काश्मीरचे प्रख्यात मौलवी आहेत. शुक्रवारी शहरातील नौहट्टा भागात त्यांचा कार्यक्रम होता. मात्र, त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर मीरवाइज यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुन्हा एकदा शुक्रवारी मला नजरकैदेत ठेवण्यात आले आणि जामा मशिदीत नमाज अदा करण्यापासून रोखण्यात आले. पोलिस अधिकारी माझ्या मूलभूत धार्मिक अधिकारांना पायदळी तुडवत आहेत, हे अत्यंत दुःखद आणि संतापजनक आहे. 
   
त्यांनी मुत्ताहिदा मजलिस उलेमा या अनेक धार्मिक संघटनांच्या गटाने वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात तयार केलेल्या ठरावाची प्रतही पोस्ट केली. या ठरावात म्हटले आहे की, मुताहिदा मजलिस-ए-उलेमा जम्मू आणि काश्मीर नवीन कायद्यातील तरतुदींबद्दल चिंता व्यक्त करते. नवीन कायदा वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन आणि देखरेखीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणतो. अनेकांचा असा विश्वास आहे की, यामुळे मुस्लिम समुदायाच्या धार्मिक मालमत्तेवर देखरेख ठेवण्याची भूमिका आणि अधिकार कमी होऊ शकतो, जे परंपरेने इस्लामिक तत्त्वांनुसार व्यवस्थापित केले जातात. 

Related Articles