आणखी हल्ल्यांची तहव्वूरने केली होती आखणी   

एनआयएचा दावा

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ हल्ल्याप्रमाणेच अन्य शहरांवर हल्ला करण्याची योजना तहव्वूर राणा याने आखली होती, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) येथील न्यायालयात केला.मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर याला एनआयएने शुक्रवारी पहाटे विशेष न्यायालयासमोर उभे केले. त्यावेळी, . एनआयएचे विशेष न्यायाधीश चंदर जीत सिंग यांनी त्याला १८ दिवसांची कोठडी सुनावली. तसेच, २४ तासांत त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले. यासोबतच, तहव्वूरला वकिलास भेटण्याची परवानगी दिली. त्यावेळी एनआयएचे अधिकारी उपस्थित असतील, असेही स्पष्ट केले. हे अधिकारी काही अंतरावर उभे राहतील, असेही न्यायालयाने सांगितले. यासोबतच, तहव्वूरला साधी पेन वापण्यास न्यायालयाने परवानगी दिली.
 
मुंबईवरील हल्ल्याचा कट कसा रचला गेला, हे जाणून घेण्यासाठी एनआयएने तहव्वूर याच्या कोठडीची मागणी केली. १७ वर्षांपूर्वी हा हल्ला झाला होता. या संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी तहव्वूर याला घटनास्थळी नेणे आवश्यक आहे. तसेच, त्याची सखोल चौकशीदेखील करयाची आहे. त्यामुळे, एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने १८ दिवसांची कोठडी दिली.मुंबईप्रमाणेच तहव्वूरने देशभरात हल्ल्याची आखणी केली होती. तहव्वूर कोणत्या शहरांना लक्ष्य करू पाहत होता, हेही जाणून घ्यायचे आहे, असेही एनआयएने युक्तीवादादरम्यान न्यायालयात सांगितले.यावेळी एनआयएचे महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, दिल्ली पोलिसांचे पाच पोलिस उपायुक्त न्यायालयात उपस्थित होते.एनआयए मुख्यालयात एक चौकशी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात तपासाशी संबंधित फक्त १२ सदस्यांना प्रवेश असणार आहे. यामध्ये एनआयएचे प्रमुख सदानंद दाते, महानिरीक्षक आशिष बत्रा, उप महानिरीक्षक जया रॉय यांचा समावेश आहे.

Related Articles