प्रेम संबंधाला विरोध; आईचा खून   

मुलासह त्याच्या प्रेयसीला केली अटक

सोलापूर - ( प्रतिनिधी ) -  सिन्नूर ता. अक्कलकोट येथे प्रेमसंबंधाच्या आड आल्यामुळे सख्ख्या पोटच्या पोराने आणि त्याच्या प्रेयसीने मिळून आईला तिच्याच साडीच्या पदराने गळफास देउन खून केला. ही घटना गुरूवारी १० एप्रिल रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संगप्पा गणपती उजनी यांच्या शेतात घडली.
  
भिमाबाई हणमंत कळसगोंड (वय ४८) रा. सिन्नूर ता. अक्कलकोट असे खून झालेल्या महिलेचे नांव आहे. याप्रकरणी आरोपी मुलगा रमेश हणमंत कळसगोंड व प्रेयसी गायत्री गुरप्पा जेवरगी (दोघे रा. सिन्नूर ता. अक्कलकोट) यांच्या विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्याद मृत महिलेचे पती हणमंत भागप्पा कळसगोंड (वय ५४), धंदा शेती रा. सिन्नर ता. अक्कलकोट यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संगप्पा गणपती उजनी यांच्या शेतात मृत भिमाबाई यांनी आरोपी मुलगा रमेश कळसगोंड व त्याची प्रेयसी गायत्री जेवरगी यांच्या प्रेम संबंधाला विरोध दर्शवला. त्यामुळे चिडलेल्या मुलाने व त्याच्या प्रेयसीने संगनमत करुन आपल्या आईलाच तिच्या अंगावरील साडीच्या पदराने गळा आवळून जीवे ठार मारले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सपोनि सुरवसे हे करत आहेत. 

Related Articles