काँग्रेस नेते कन्हैया कुमार बिहार पोलिसांच्या ताब्यात   

पाटणा : बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार पदयात्रा करत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत बऱ्याच कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. कन्हैया कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याची योजना आखली होती.
 
ते मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार होते. 'पलायन रोको-नौकरी दो' या यात्रेच्या शेवटी कन्हैया कुमार यांनी हे नियोजन केले होते. पण पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतले. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिव प्रकाश गरीब दास यांना सुद्धा अटक झाली.

१५ ते २० कार्यकर्ते ताब्यात

DSP कृष्ण मुरारी यांनी सांगितले की, "जे लोक आंदोलनाचे नेतृत्व करत होते, त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांना कोतवाली पोलीस स्टेशनला नेले आहे. या लोकांना आधी शांतपणे आंदोलन करण्याची सूचना दिली होती. पण जमाव खूप आक्रमक झाला, त्यामुळे पाण्याचे फवारे मारावे लागले. आम्ही १५ ते २० लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यात कन्हैया कुमार पण आहेत."
 
पोलिसांनी सगळ्यांना राजपूर पुलावरच थांबवले. पण कार्यकर्ते तिथेच थांबून घोषणा देत होते. या यात्रेत राहुल गांधी झाले होते. या यात्रेत काँग्रेसचे मोठे नेते सहभागी होते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी बेगुसरायला आले होते. तर सचिन पायलट सुद्धा पदयात्रेत सहभागी झाले. या पदयात्रेचा उद्देश बिहारमधील बेरोजगारी आणि लोकांचे शहरांकडे कामासाठी स्थलांतर करणे यावर लक्ष केंद्रित करणे हा होता. कन्हैया कुमार आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारला या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसली.आता या अटकेनंतर काँग्रेस कार्यकर्ते काय भूमिका घेतात आणि सरकार यावर काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
 

Related Articles