बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार   

पाटणा : बिहारमध्ये गेल्या दोन दिवसांत वीज कोसळून आणि वादळी वार्‍यामुळे ३६ जणांचा बळी गेला आहे. एकूण बळींची संख्या ६१ वर पोहोचली असल्याचे अधिकार्‍यांनी शुक्रवारी सांगितले.
 
वादळी वारे आणि पावसामुळे ३९ जणांचा बळी गेला. गुरुवारी २२ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळपर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला होता. विविध जिल्ह्यांतील घटनांची माहिती आणि आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर बळींची संख्या ६१ वर गेली, असे अधिकार्‍यांनी सांगितले. नालंदा जिल्ह्यात सर्वाधिक २३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ भोजपूर (६), सीवान, गया, पाटणा आणि शेखपुरा येथे प्रत्येकी चौघांचा आणि जेहानाबादमध्ये (दोन), गोपालगंज, मुजफ्फरपूर, अरवाल, दरभंगा, बेगुसराय, सहर्षा, कठिहार, लखीसरायी, नवादा आणि भागलपूर जिल्ह्यात प्रत्येकी एकचा मृत्यू झाला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने काल दिली. वीज कोसळणे,  मेघगर्जनेसह वृष्टीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली.बिहारच्या चार जिल्ह्यांत बुधवारी वीज कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला होता. 

२०२३ मध्ये २७५ जणांचा मृत्यू

बिहारचा आर्थिक पाहणी अहवाल अंदाजपत्रकी अधिवेशनात फेब्रुवारीत मांडला होता. त्यात म्हटले आहे की, २०२३ मध्ये वीज आणि मेघगर्जनेसह पडलेल्या पावसात २७५ जणांचा बळी गेला होता. सर्वाधिक २५ जणाां मृत्यू रोहतसमध्ये झाला. गया (२१), औरंगाबाद (१९), जामुई (१७), माधेपुरा आणि भागलपूरमध्ये प्रत्येकी १६ जणांचा मृत्यू झाला होता. 
 

बिहारच्या काही जिल्ह्यात आजही ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागाने बिहारच्या काही जिल्ह्यात आजही ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये दरभंगा, पूर्व चंपारण, गोपालगंज, पश्चिम चंपारण, किशनगंज, अररिया, सुपौल, गया, सीतामढी, शेओहर, नालंदा, नवाडा आणि पाटणा या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि वीज कोसळल्याने किमान २२ जणांचा मृत्यू झाला. फतेहपूर आणि आझमगड जिल्ह्यात प्रत्येकी तीन, फिरोजाबाद, कानपूर देहात आणि सीतापूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, गाजीपूर, गोंडा, अमेठी, संत कबीर नगर आणि सिद्धार्थनगर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. बलिया, कन्नौज, बाराबंकी, जौनपूर आणि उन्नाव जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू वीज पडून झाला आहे, असे वृत्तात म्हटले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले आहे. 
 

Related Articles