दहा जणांवर तडीपारीची कारवाई   

हडपसर : पुणे पोलिस परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ.राजकुमार शिंदे यांनी हद्दीत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध गुन्ह्यातील दहा आरोपींना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. एकाच वेळीस दहा जणांना तडीपार केल्यांनी गुन्हेगारांवर आता वचक बसणार आहे.साहिल राजू साठे (वय १९, रा. केशवनगर, मुंढवा) याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, दरोडा तयारी, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, हत्यार बाळगून दहशत निर्माण करणे असे ५ गुन्हे मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वसीम सलीम पटेल (वय ४०, रा. पटेल क्लासिक, साईबाबानगर, कोंढवा खुर्द, मुळ रा. दांडेकर पुल) याच्याविरुद्ध जबरी चोरी, चोरी, विनयभंग, अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगणे, हत्यार बाळगणे असे ८ गुन्हे कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
 
फिरोज महंमद शेख (वय २९, रा. घोरपडे वस्ती, कदमवाक वस्ती, ता. हवेली) याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे एकूण ४ गुन्हे दाखल होते़ डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्याला २ वर्षे पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. हनुमंत ऊर्फ बापू दगडु सरोदे (वय ४८, रा. कॅनॉल शेजारी, भीमनगर, मुंढवा) याच्यावर बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे, मारहाण, धमकावणे यासारखे ७ दाखलपात्र व अदखलपात्र गुन्हे मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
 
प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २० रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, सध्या रा. लोणी स्टेशन) याच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगुन दहशत निर्माण करणे, मारहाण करणे दुखापत करणे, खासगी मालमत्तेचे नुकसान करणे यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत. त्याला २ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
 
ओंकार शिवानंद स्वामी (वय २३, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्यावर गंभीर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, धमकावणे, हत्यार जवळ बाळगणे असे ४ गुन्हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.चंद्रशेखर ऊर्फ चंद्रकांत ऊर्फ पिल्या दाजी चोरमोले (चोरमले) (वय २३, रा. गायकवाड चाळ, माळीमळा, लोणी काळभोर) याला बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारहाण, धमकावणे, दहशत निर्माण करणे, खासगी मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारे ५ गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
 
अजय दीपक जाधव (वय ३५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) याच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, बलात्कार, मारहाण, दुखापत करणे यासारखे १० दाखलपात्र व अदखलपात्र गुन्हे मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.आदिराज मनोज कामठे (वय २१, रा. भागीरथीनगर, साडेसतरानगळी रोड, हडपसर) याच्यावर जबरी चोरी, मारहाण, धमकावणे, दुखापत करणे, हत्यार जवळ बाळगणे यासारखे ३ गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
 
वसीम ऊर्फ वस्सु शकील खान (वय २५, रा. भाग्योदयनगर, मुबारक मंजिल,कोंढवा) याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमविणे, हत्यार बाळगणे, अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणे, अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगणे असे ४ गुन्हे कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.या पुढे ही शंभर हून अधिक गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए,गुन्हेगारांवर तडीपारीची टांगती तलवार आहे. यासाठी परिमंडळ पाचच्या हद्दीतील सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

Related Articles