तहव्वूर राणाला भारतात आणले   

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अखेर भारतात आणण्यात आले. अमेरिकेतील कायदेशीर आणि सरकारी सोपस्कार पार पडल्यानंतर भारतीय अधिकार्‍यांच्या पथकाने त्याला विशेष विमानाने दिल्लीत आणले. दिल्ली विमानतळावर उतरताच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तहव्वूरला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. तोपर्यंत तो कडेकोट बंदोबस्तात एनआयएच्या मुख्यालयात असणार आहे.
 
सुरूवातीला तहव्वूर याचा ताबा एनआयएकडे राहील. त्यानंतर, त्याला मुंबई पोलिसांकडे सोपविले जाईल. याकाळात त्याला तिहार आणि मुंबईतील कारागृहात अंडा सेलमध्ये  ठेवले जाईल. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी रात्री एक अधिसूचना जारी करत, या खटल्याच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील म्हणून नरेंद्र मान यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी किंवा निर्धारित वेळेत सुनावणी पूर्ण होईपर्यंत असेल, असे सहसचिव अभिजित सिन्हा यांनी म्हटले आहे. मान हे नावाजलेले वकील आहेत. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केंद्रीय गुप्तचर विभागाचे (सीबीआय) प्रतिनिधित्व केले आहे. 
 
तहव्वूरला अमेरिकेतून भारतात आणण्यात वकील दयान कृष्णन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. एनआयएकडून तेच बाजू मांडणार आहेत. तहव्वूरला कठोरात कठोर शिक्षा कशी मिळेल, यासाठी आपण प्रयत्न करू, असे कृष्णन यांनी म्हटले आहे. वकील संजीवी शेषाद्रि आणि वकील श्रीधर काळे हेही मदतीला असतील.पाकिस्तानी वंशाचा असलेल्या आणि कॅनडामध्ये राहणार्‍या तहव्वूर याने डेव्हिड हेडली या दहशतवाद्याच्या मदतीने २६/११च्या हल्ल्याची आखणी केल्याचा आरोप आहे. अमेरिकेत अटक झाल्यानंतर भारताने त्याला सोपविण्याबाबत मागणी केली होती. त्याला तहव्वूरने अमेरिकेतील न्यायालयात आव्हान दिले होते. दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर तहव्वूरचा ताबा मिळविण्यात भारताला यश आले. 
 
भारतीय गुप्तचर विभागातील अधिकार्‍यांचे एक पथक अमेरिकेला गेले होते. अमेरिका सरकारने सोपस्कार पार पडल्यानंतर परवा सायंकाळी तहव्वूरचा ताबा दिला. त्यानंतर, भारतीय अधिकार्‍यांच्या पथकाने त्याला दिल्लीत आणले.तहव्वूर याने १३ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २००८ दरम्यान पत्नी समराज राणा अख्तरसह उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा, दिल्ली, केरळमधील कोची, गुजरातमधील अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील मुंबईला भेट दिली होती.
 
तहव्वूर हा लष्कर ए तोयबाचा सदस्य होता. तो  डेविड हेडलीचा खास मानला जात होता. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याआधी तहव्वूर आणि हेडली यांची अनेकदा बैठक झाली. हेडलीने अमेरिकन तपास यंत्रणेसमोर तहव्वूर याचे नाव घेतले होते. हेडली मुंबई हल्ल्याआधीच भारतात आला होता. त्याने मुंबईतील ताज हॉटेलसह अन्य प्रमुख जागांची रेकी केली होती. त्यानंतर, आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याद्वारे प्रशिक्षण दिलेले लष्कर ए तोयबाचे दहशतवादी मुंबईत शिरले आणि त्यांनी ताज हॉटेलसह इतर ठिकाणांवर हल्ले केले. तहव्वूरने हेडलीसाठी बनावट व्हिसा बनवला होता.
 
२६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने मुंबईत घुसखोरी केली होती. रेल्वे स्टेशन, दोन हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर एकाचवेळी हल्ला केला होता. सुमारे ६० तास चाललेल्या या हल्ल्यात १६६ नागरिक ठार झाले होते. यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलमधील काही नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्याने संपूर्ण देशा हादरला होता. दहशतवादी अजमल अमीर कसाबला जिवंत पकडण्यात आले. नोव्हेंबर २०१२ मध्ये कसाबला पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.
 
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू (जेएनएन) मेट्रो स्टेशनचे प्रवेश दार क्रमांक २ काल बंद ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयासमोर मेट्रोचे हे प्रवेश दार आहे. तहव्वूरला ताब्यात घेताच एनआयएच्या मुख्यालयात नेण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. एनआयए मुख्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सीसीटीव्हीसह ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमातून सर्वत्र करडी नजर ठेवली जात होती. मुख्यालयाच्या दोन किलोमीटर परिसरात सामान्यांना प्रवेशास मनाई होती. जेएलएन मेट्रो स्टेशनचे गेट क्रमांक २ एनआयएच्या मुख्यालयाच्या सर्वांत जवळ आहे. खबरदारी म्हणून ते तात्पुरते बंद राहील, असे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) च्या प्रवक्त्याने सांगितले. मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सुरू  राहील. मात्र, प्रवेश दार क्रमांक २ येथून कोणास आत येता येणार नाही किंवा बाहेर पडता येणार नाही. पण, अन्य मार्ग प्रवाशांसाठी नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.
 

Related Articles