औषधांच्या किंमतवाढीचा रुग्णांना ताप!   

वृत्तवेध 

राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडला आहे.केंद्र सरकारने औषधांच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण औषधांच्या किंमती औषध नियंत्रित यादीत सहभागी केल्या आहेत. सरकारी आकड्यांनुसार, त्यामुळे देशभरातील रुग्णांची दर वर्षी सुमारे ३,७८८ कोटी रुपयांची बचत होते; पण आता या किंमत नियंत्रण यादीतील औषधे महागल्याने ग्राहकांच्या खिशावर ताण आला आहे.
किती वाढल्या किंमती?
 
या विषयीच्या अहवालानुसार, कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग आणि अँटिबायोटिक्स सारख्या अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत १.७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या वाढीला राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाची (एनपीपीए) मंजुरी आवश्यक असते. ही संस्था देशातील औषधांच्या किंमती नियंत्रित करण्याचे काम करते. कंपन्यांना या दरवाढीने दिलासा मिळाला आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईने हैराण केले आहे; पण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हा अतिरिक्त आर्थिक भार आहे. त्यामुळे त्यांच्या औषधांवरील खर्च वाढला आहे.
 
का वाढल्या किंमती?
 
‘एनपीपीए’ने दिलेल्या माहितीनुसार, महागाईआधारित मूल्य पुनरावलोकनामुळे औषधांच्या किंमतवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. दर वर्षी सरकार आवश्यक औषधांच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांचे पुनरावलोकन करते. यंदा घाऊक मूल्य निर्देशांकांमधील वाढीमुळे औषध कंपन्यांना किंमती वाढवण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
 
‘या’ औषधांच्या किंमतीत वाढ
 
राष्ट्रीय आवश्यक औषध यादीमध्ये समाविष्ट औषधांच्या किंमतीत या वेळी वाढ झाली आहे. अँटिबायोटिक्स, वेदनाशामक औषधे, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवरील औषधांच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचा भार रुग्णांच्या खिशावर पडला आहे. त्यांना आता पुढील आदेश येईपर्यंत वाढीव दराने औषधखरेदी करावी लागेल.

Related Articles