कर्नाटक हापूसच्या हंगामास उशीर   

पुढील महिन्यात आवक वाढण्याची अपेक्षा

पुणे : लांबलेल्या पावसाचा कर्नाटक हापूसला मोठा फटका बसला आहे. त्याचाच परिणाम म्हणून हंगाम उशीराने सुरू झाला आहे. येत्या पंधरा दिवसांत कर्नाटक हापूसची आवक वाढण्यास सुरूवात होणार आहे. मे महिन्यात मात्र खुप आवक असणार आहे. आवक वाढल्यानंतर दरही आवाक्यात असतील. अशी माहिती व्यापारी रोहण उरसळ यांनी दिली. 
 
उरसळ म्हणाले, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कर्नाटकमध्ये हापूस आंब्याला चांगला मोहोर आला होता. मात्र, सात्याने हवामानात बदल होत होता. त्याचा फटका आंब्याच्या झाडांना बसला. मोठ्या प्रमाणात मोहोर गळून पडला. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या टप्यात बाजारात अधिक प्रमाणात आवक होवू शकली नाही. मात्र आता झाडांवर असलेल्या फळांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसांत कर्नाटक हापूसची आवक वाढेल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी ७०० ते ८०० पेटी आवक होत असते. मात्र केवळ १५० ते २०० पेट्यांची आवक होत असल्याचेही उरसळ यांनी नमूद केले. 
 
कर्नाटकातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांच्या अंदाजानुसार १५ एप्रिलनंतरच चांगल्या प्रकारे आंब्याची आवक सुरु होईल. यंदा आंब्याची आवक १० ते १५ जुनपर्यंत सुरू राहणार आहे. सद्य:स्थितीत घाऊक बाजारात ४ ते ५ डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीला १२०० ते १८०० रुपये भाव मिळत आहे. 
 
दोन डझनाच्या बॉक्सला ३०० ते ६०० रूपये दर मिळत आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात कर्नाटकाच्या विविध भागातून आवक होत आहे. मागील वर्षी मे महिन्यात २० ते २५ हजार पेट्यांची रोज आवक झाली होती. तितक्याच बॉक्सचीही आवक झाली होती. यंदाही हंगामाच्या दुसर्‍या टप्यातील आवक आवढणार असल्याने मागील वर्षीप्रमाणे आवक होवू शकते. असेही रोहन उरसळ यांनी स्पष्ट केले. 
 
गेल्या वर्षी पावसाळा लांबल्याने फटका
 
मागील वर्षी पावसाळा लांबला होता. त्याचा फटका उत्पादनावर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमीच होण्याची शक्यता आहे. हंगाम लांबल्याने सद्य:स्थितीत आवक कमीच आहे. येत्या पंधरा दिवसांत आवक वाढण्यास सुरूवात होईल. त्यानंतर आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आवक वाढल्यानंतर दरही आवाक्यात राहू शकतील. 
 
- रोहन उरसळ, कर्नाटक हापूसचे व्यापारी
 
घाऊक बाजारातील दर
 
आंबा डझन/ किलो दर
हापूस ४ ते ५ डझन १२०० ते १८००
हापूस २ डझन ३०० ते ६००
पायरी १ किलो १२० ते १५०
लालबाग १ किलो ८० ते १००
बदाम १ किलो ८० ते १००

Related Articles