राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर   

चंडीगढ : हरयानातील रोहतकच्या सुनारिया तुरुंगात बलात्कार आणि खून प्रकरणात २० वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याला २१ दिवसांची फरलो रजा मिळाली आहे. २१ दिवस तो सिरसा येथील डेरामध्ये राहणार आहे.बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राम रहीम कडक सुरक्षेत तुरुंगातून सिरसाला रवाना झाला. यापूर्वी, २८ जानेवारी २०२५ रोजी तो ३० दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने सिरसा डेरा येथे १० दिवस आणि उत्तर प्रदेशातील बर्नवा येथे २० दिवस पॅरोल काढला. यावेळी २१ दिवस  तो सिरसा येथील डेरात त्याच्या अनुयायांना भेटणार आहे. सिरसा डेराचा स्थापना दिन असल्याचेही सांगितले जात आहे.  
 
दोन साध्वींच्या लैंगिक शोषण प्रकरणात २५ ऑगस्ट २०१७ रोजी राम रहीमला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर १७ जानेवारी २०१९ रोजी पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच वेळी ऑक्टोबर २०२१ मध्ये सीबीआय न्यायालयाने डेरा व्यवस्थापक रणजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.शिक्षा सुनावल्यानंतर तीन वर्षांनी राम रहीमला उच्च न्यायालयाने या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे. राम रहीम तुरुंगातून बाहेर येण्याची ही १३ वी वेळ आहे.
 

Related Articles