गोध्रा हत्याकांडातील अल्पवयीन आरोपींना २३ वर्षांनी शिक्षा   

बाल न्याय मंडळाने घेतला मोठा निर्णय

गोध्रा : गोध्रा येथे सुमारे २३ वर्षांपूर्वी घडलेल्या साबारमती एक्सप्रेस रेल्वे हत्यकांडाच्या प्रकरणात गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील बाल न्याय मंडळाने त्या वेळी अल्पवयीन असलेल्या तीन जणांची तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या हत्याकांडात ५९ कारसेवकांची हत्या झाली होती. त्यानंतर राज्यभरात दंगली उसळल्या होत्या. बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष के एस मोदी यांनी तिघांना बालसुधारगृहात तीन वर्षांची शिक्षा सुनावली असून, प्रत्येकी दहा हजार रुपये दंडही ठोठावला आहे. या तीनही आरोपींचे वय आता ४० च्या आसपास आहे.
 
२००२ च्या गोध्रा ट्रेन हत्याकांडावेळी आरोपी किशोरवयीन होते. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना बाल न्याय मंडळाने निर्दोष मुक्त केले. घटनेच्या वेळी ते देखील किशोरवयीन होते. दोषींचे वकील सलमान चरखा यांनी सांगितले की, बाल न्याय मंडळाने तिन्ही दोषींची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली आहे. जेणेकरून त्यांना उच्च न्यायालयात आदेशाविरुद्ध अपील करता येऊ शकेल.

११ दोषींना फाशीची शिक्षा

२०११ मध्ये या प्रकरणी गोध्रा येथील न्यायालयाने ३१ आरोपींना दोषी ठरवले आणि ६३ जणांना निर्दोष सोडले. कनिष्ठ न्यायालयाने ११ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये, गुजरात उच्च न्यायालयाने बऱ्याच दोषींची शिक्षा कायम ठेवली आणि ११ जणांच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले होते.
 

Related Articles