जालंधरमध्ये भाजप नेत्याच्या घराबाहेर स्फोट   

मुख्यमंत्री मान यांच्या राजीनाम्याची मागणी

चंडीगढ : पंजाबच्या जालंधरमध्ये भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या निवासस्थानाबाहेर मंगळवारी पहाटे हातबॉम्ब फेकण्यात आला. त्यानंतर, मोठा स्फोट झाला. सुदैवाने, यात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र, घराचे नुकसान झाले, असे पोलिसांनी सांगितले.या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे, भाजपने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
विशेष म्हणजे, हल्ल्यावेळी माजी कॅबिनेट मंत्री आणि पंजाब भाजपचे माजी अध्यक्ष कालिया घरीच होते. हा स्फोट भीषण होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मागील चार-पाच महिन्यांत अमृतसर आणि गुरुदासपूरमधील पोलिस चौक्यांना  लक्ष्य करताना अशाच पद्धतीने स्फोट घडवून आणण्यात आला. मात्र, राजकीय क्षेत्रातील व्यक्तीला लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना आहे.दरम्यान, राज्यातील कथित बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल विरोधी पक्षांनी ‘आप’ सरकारला घेरले. तसेच, गृहखाते स्वतः जवळ ठेवणारे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
 
भाजप नेते कालिया यांचे शास्त्री मार्केट जवळ घर आहे. पहाटे एकच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटामुळे स्वयंपाकघरातील खिडकीच्या काचा फुटल्या. स्वच्छतागृहाच्या  दरवाजाचे नुकसान झाले. अंगणात उभी असलेली इलेक्ट्रिक मोटार आणि दुचाकी यांचे नुकसान झाले, असे  पोलिस उपायुक्त मनप्रीत सिंग यांनी सांगितले.रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास कालिया यांच्या घरावर हातबॉम्ब फेकला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे, असे भाजपचे जालंधरचे जिल्हाध्यक्ष सुशील शर्मा यांनी सांगितले. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर पोलिस स्टेशन आहे.या स्फोटानंतर जालंधरचे पोलिस आयुक्त धनप्रीत कौर यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, शहरातील बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांसह महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 

Related Articles