पवन, सौर ऊर्जानिर्मितीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसर्‍या क्रमांकावर   

नवी दिल्ली : भारत २०२४ या वर्षात हा पवन आणि सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. यात भारताने जर्मनीला मागे टाकले आहे, अशी माहिती मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून समोर आली आहे.
 
’एम्बर’ संस्थेच्या ’ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू २०२५’ या अहवालानुसार भारत ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. २०२४ मध्ये भारतात २७ टक्के वीज निर्मिती ही सौर, वार्‍याच्या आणि इतर अक्षय ऊर्जेच्या स्रोतांद्वारे झाली. या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे, की भारतात वीज निर्मितीतून होणार्‍या कार्बन उत्सर्जनाचा दर काहीसा स्थिर राहिला असला, तरीही पारंपरिक कोळसा वापरावर अद्याप मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व आहे. मात्र, नव्याने उभारल्या गेलेल्या उत्पादन क्षमतेपैकी ७१ टक्के ही अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांची आहे. या अहवालात असे म्हटले आहे, की २०२४ मध्ये भारताने जगातील एकूण सौर आणि पवन ऊर्जा उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन घेतले आहे.
 
अक्षय ऊर्जा आणि अणुऊर्जेसह कमी-कार्बन स्रोत २०२४ मध्ये जगातील ४०.९ टक्के वीज निर्मिती केली आहे. १९४० नंतर या वर्षी पहिल्यांदाच अणुऊर्जा उत्पादन ४० टक्क्यांपेक्षा जास्त झाले. भारतात, २२ टक्के ऊर्जा स्वच्छ स्रोतांपासून निर्माण केली जात होती. यामध्ये जलविद्युत उर्जेचा वाटा सर्वाधिक ८ टक्के होता, तर पवन आणि सौर ऊर्जेचा मिळून १० टक्के वाटा होता. जागतिक स्तरावर, २०२४ मध्ये विक्रमी ८५८ टेरावॅट-तास स्वच्छ ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे, जी २०२२ मध्ये प्रस्थापित केलेल्या मागील विक्रमापेक्षा ४९ टक्के जास्त आहे.
 

Related Articles