जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ कायम   

विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव

जम्मू : जम्मू आणि काश्मीर विधानसभेत मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी नवीन वक्फ कायद्यावरून गदारोळ झाला. नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी विधेयकावर चर्चा करण्याची मागणी करत सभागृहात घोषणा दिल्या. यावेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांच्याविरोधात काश्मीर खोर्‍यातील तीन आमदारांनी अविश्वास ठराव आणला आहे. 
 
हंदवाडाचे आमदार सज्जाद गनी लोन, कुपवाडाचे आमदार मीर महमद फैयाज आणि त्रालचे आमदार रफीक अहमद यांनी विधानसभा सचिवांकडे एक पानाचा अविश्वास ठराव सोपविला आहे.
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांच्यासह सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार काल सभागृहात आक्रमक झाले. त्यावेळी अध्यक्षांनी पुन्हा एकदा नियमानुसार यावर चर्चा होऊ शकत नाही, असे सांगितले. तसेच, आपण आपला निर्णय बदलणार नाही, असेही स्पष्ट केले. नॅशनल कॉन्फरन्सच्या एका आमदाराने सोमवारी वक्फ कायद्याची प्रत फाडली होती. त्यानंतर, अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले होते. काल कामकाजास सुरूवात होताच पुन्हा गदारोळ झाला.
 
नॅशनल कॉन्फरन्सने तन्वीर सादिक यांनी वक्फ (दुरुस्ती) कायद्यावर चर्चा करण्यासाठी परवा नॅशनल कॉन्फरन्सचे झीर गुरेझी आणि तन्वीर सादिक यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत अध्यक्ष अब्दुल रहीम राथेर यांनी तो फेटाळला होता.
 

Related Articles