मच्छिमारांच्या प्रश्नांकडे पंतप्रधान मोदींचे दुर्लक्ष   

स्टॅलिन यांचा आरोप 

चेन्नई : तामिळनाडूतील मच्छिमारांच्या प्रश्नांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सोमवारी केला. तसेच कच्चाथीवू बेट भारताचा भूभाग बनविण्यासाठी कोणतीही पावले उचलली नसल्याचे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच श्रीलंकेचा दौरा केला. त्या दौर्‍यात तामिळनाडूतील मच्छिमारांच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली नसल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. दोन्ही देशांचे मच्छिमार मासेमारी करताना अनेकदा अनवधानाने सागरी सीमांचे उल्लघन करतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते. अटक केली जाते. या विषयांवर मोदी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. 
 
कच्चाथीवू बेटाबाबतचा मुद्दा देखील त्यांनी श्रीलंके समोर मांडला नाही, असे सांगताना स्टॅलिन म्हणाले. श्रीलंकेच्या ताब्यातील तामिळनाडूच्या बोटी आणि मच्छिमारांच्या सुटकेबाबत कोणताही पुढाकार मोदी यांनी घेतला नाही. श्रीलंकेला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात  कच्चाथीवू  बेट भेट दिले होते. तो भारताचा भूभाग होण्याबाबत कोणतीही चर्चा का करण्यात आली नाही ? तामिळनाडू सरकारने तशी मागणी केली होती. या सर्व बाबी निराश करणार्‍या ठरल्या आहेत. 
 
दरम्यान, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा दिस्सानायके यांनी शनिवारी  सांगितले की, भेटीदरम्यान मोदी यांनी आग्रह धरला की, मानवतेच्या दृष्टीकोनातून दोन्ही देशांच्या मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा आणि येत्या काही दिवसांत तामिळनाडूच्या १४ मच्छिमारांची सुटका करुन श्रीलंका पहिले पाऊल  उचलणार आहे. 
 

Related Articles