ट्रम्प जोमात, बाजार कोमात   

धनंजय दीक्षित 

२ एप्रिल रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी आपले बोलणे खरे करून दाखवले आणि कुठेही दुजाभाव ना करता सर्व देशांवर विविध प्रमाणात टॅरिफ लागू केले. अमेरिकेबरोबर व्यापार करताना या वाढलेल्या टॅरिफ चा जो परिणाम होईल तो कळेलच; परंतु जगभरातील सर्व बाजारांनी त्याची प्रतिक्रिया तुरंत दिली. सोने, चांदी, तेल, या बरोबर इतर धातू बाजार आणि अर्थात शेअर बाजार सगळीकडे किंमतींची दाणादाण झालेली दिसून आली. आपल्याकडेच ३ तारखेला बाजाराने जरा कणखरपणा दाखवला (छे: छे: मला लागलं नाही.... असं पाय घसरून पडल्यावर आपण म्हणतो तसे) पण शुक्रवारी मात्र आपल्या बाजाराने सुद्धा जागतिक बाजारांच्या पावलावर पाऊल ठेऊन धीर सोडला. (सुरुवातीला शाळेत पहिले २ दिवस न रडलेले मूल तिसर्‍या दिवशी सगळ्यांच्या आधी गळा काढते तसे). सर्व शेअर मध्ये मनसोक्त विक्री दिसून येत होती. लार्ज कॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप असा कुठलाही ही भेदभाव न करता सर्वसमावेशक विक्री चालू होती. ही अशी विक्री कोव्हिड नंतर प्रथमच झाली असेल.... जे गुंतवणूकदार २०२० नंतर बाजारामध्ये सक्रिय झालेत त्यांना तर ही पडझड म्हणजे जगबुडी झाली आहे असे वाटल्यास अजिबात नवल नाही.  कारण गेली चार साडेचार वर्षे, एवढी सार्वत्रिक मंदी आणि समोर फक्त अनिश्चितता असण्यासारखे काही घडलेच नाही जे आता घडलंय 
 
किती दिवस चालेल हे सगळे?
 
कुणास ठाऊक.... परंतु कोव्हिड सारख्या मानव जातीच्या जिवावर उठलेल्या दुखण्यामधून जग आणि बाजार सावरले आहेत. टॅरीफ वाढ  ही तर एका बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षाने स्वतःच्या देशाला डबघाईपासून वाचवण्या करिता जगाला दिलेली धमकी आहे (ज्याने त्या देशाला ही महागाई चा सामना करावा लागूच  शकतो). काही देश अमेरिकेवर टॅरिफ लावतील. बाजार अजून पडतील; पण शेवटी काही ना काहीतरी तडजोड-वाटाघाटी निश्चित होणार व ह्यातूनही बाजार नक्की सावरणार. त्यासाठी वेळ किती लागेल हे सांगणे मात्र अशक्य आहे. धीर धरावा लागेल.

Related Articles