रूग्णालयातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले   

पुणे : दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि पैशांच्या हव्यासामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. रुपये न भरल्यामुळे या महिलेवर उपचार करण्याचे टाळल्याचा प्रकार समोर येत आहे. रूग्णालयात ३१ मार्च रोजी घडलेल्या या प्रकारानंतर राज्यस्तरावरून दीनानाथ रुग्णालयासह अन्य धर्मदाय रुग्णालयांवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना अलंकार पोलिसांनी रुग्णालयात गर्भवती महिला दाखल झाल्यापासून, रुग्णालयातून बाहेर जाईपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्याचा अहवाल ससून रूग्णालय प्रशासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर जो निर्णय होईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाविरोधात भिसे कुटुंबियांनी अलंकार पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीत रुग्णालयाने केलेल्या अंतर्गत समितीचा अहवाल जगजाहीर करून दीनानाथ मंगेशकरच्या समिती सदस्यांसह आणि इतर चार जणांवर बदनामी आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज पोलिसांकडे दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
 
समाजमाध्यमातून प्रसारित केलेला हा अहवाल जगजाहीर झाल्यामुळे, आयव्हीएफ बाबतची माहिती ही आमची खासगी बाब आहे, त्यात पैशांमुळे उपचार न करणार्‍या डॉ. घैसास यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीदेखील भिसे कुटुंबियांकडून करण्यात आली. यासंदर्भातील एक पत्र भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे देखील दिले आहे.
 
घटनेच्या दिवशीचे सकाळी साडेनऊ चे दुपारी अडीच या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही तपासले आहे. या फुटेज संदर्भातील अहवाल आणि भिसे कुटुंबियांनी दिलेली तक्रार याचा अहवाल आम्ही ससून प्रशासनाकडे पाठवणार आहोत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला थेट याप्रकरणी गुन्हा दाखल करता येत नसल्याने, प्रशासनाचा जो निर्णय येईल, त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी सांगितले.
 

Related Articles