बिहार काँग्रेसच्या पदयात्रेत राहुल गांधी सहभागी   

बेगुसरायध्ये पलायन रोखा, नोकरी द्याची मागणी 

पाटणा : बिहारमध्ये काँग्रेसने पलायन रोखा, नोकरी द्या, अशी पदयात्रा सुरू केली आहे. बेगुसराय येथे आयोजित पदयात्रेत काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सोमवारी सहभागी झाले. 
 
बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात पदयात्रेचे आयोजन केले होते. पांढरा टी शर्ट, निळी पँट घालून ते कन्हैय्या कुमार, प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार यांचयासोबत पदयात्रेत सहभागी झाले. काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि युवक संघटनाचे सदस् पदयात्रेत सहभागी झाले. काँग्रेसचा ध्वज आणि संरक्षण दलातील रिकाम्या जागा तातडीने भरण्याची मागणी करणारे फलक त्यांनी हातात धरले होते. दरम्यान, गांधी यांचे पाटणा येथून बेगुसराय येथे आगमन झाले. जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाटी ज्येष्ठ नेते राजेश कुमार आले होते. राहुल यांचा वर्षभरातील तिसरा बिहार दौरा आहे. यापूर्वी त्यांनी जानेवारीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. पुढील वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे बिहार दौरे गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत.
 
पदयात्रेत सामील होण्यापूर्वी राहुल यांनी रविवारी एक्सवर पोस्ट टाकली. त्यात म्हटले आहे की, बिहारी तरुणांच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाने पदयात्रा काढली आहे. तरुण सरकारी नोकर्‍यांपासून वंचित असून खासगीकरणाचा लाभही त्यांना झालेला नाही. राज्यातील तरुणांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी राज्य सरकारवर दबाव आणणण्यासाठी काँग्रेसने आता पुढाकार घेतला आहे. दरम्यान,  बेगुसराय जिल्हा हा कनैय्या कुमार यांचा बालेकिल्ला मानला जातो. या परिसराचे ते नेते आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी चंपारण्य जिल्ह्यात पदयात्रा काढली होती. ते जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपसह एनडीएच्या आघाडीने महाआघाडीचा पराभव केला होता.  

Related Articles