जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे सावट   

 

ब्लॅक मंडे ; सेन्सेक्स २,२२७ अंकांनी घसरला
 
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादले आहे. त्यास अमेरिकेनेदेखील प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे, जागतिक बाजारपेठेत व्यापारयुद्धाचे दाट सावट पसरले आहे. त्याचे पडसाद जागतिक शेअर बाजारात उमटत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सोमवारी तब्बल २,२२६.७९ अंकांनी घसरला. मागील दहा महिन्यांतील ही मोठी घसरण आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७४२.८५ अंकांनी घसरला. त्यामुळे गुंतवणूदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल २.९५ टक्के म्हणजे २,२२६.७९ अंकांनी घसरून ७३,१३७.९० वर स्थिरावला. तर, सत्रांतर्गत निर्देशांक ५.२२ टक्के म्हणजे ३,९३९.६८ अंकांनी घसरुन ७१,४२५.०१ पर्यंत खाली आला होता. दिवसअखेर निर्देशांक बर्‍यापैकी सावरला.
दुसरीकडे, निफ्टी ३.२४ टक्के म्हणजे ७४२.८५ अंकांनी घसरून २२,१६१.६० वर स्थिरावला.
 
हिंदुस्थान युनिलिव्हर वगळता सेन्सेक्समधील सर्व समभाग घसरणीसह बंद झाले. टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक ७.३३ टक्क्यांनी घसरले. त्यानंतर, लार्सन अँड टुब्रो ५.७८ ने घसरला. टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि एचडीएफसी सह अन्य समभाग पिछाडीवर होते. मात्र, हिंदुस्तान युनिलिव्हर किरकोळ वधारला. 
 
ट्रम्प यांनी १८० देशांवर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादले आहे. याअंतर्गत विविध देशांवर १० ते ४५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले जात आहे. अमेरिकेने चीनवर ३४ टक्के ‘प्रत्युत्तर शुल्क’ आकारले. तर, भारतावर २७ टक्के शुल्क आकारले आहे. अमेरिकेला जशास तसे उत्तर म्हणून चीननेदेखील अमेरिकेतून आयात होणार्‍या वस्तूंवर ३४ टक्के शुल्क आकारले आहे. दोन आघाडीच्या अर्थव्यवस्थेत व्यापारयुद्धाचा भडका सुरू झाला आहे. त्यामुळे त्याचे पडसाद आता शेअर बाजारात उमटत आहेत. याआधी, ४ जून रोजी सेन्सेक्स ५.७४ टक्के म्हणजे ४,३८९.७३ अंकांनी घसरून ७२,०७९.०५ पर्यंत खाली आला होता. त्यावेळी सत्रांतर्गत व्यवहारात निर्देशांक ८.१५ टक्के म्हणजे ६,२३४.३५ अंकांनी घसरुन ७०,२३४.४३ पर्यंत खाली आला होता.    
 
त्याच दिवशी निफ्टी ५.९३ टक्के म्हणजे १,३७९.४० अंकांच्या घसरणीसह २१,८८४.५० वर स्थिरावला होता. दिवसभरात तो ८.५२ टक्के म्हणजे १,९८२.४५ अंकांनी घसरून २१,२८१.४५ पर्यंत खाली आला होता. कोव्हिड महामारीमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. २३ मार्च २०२० रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी १३ टक्क्यांनी घसरले होते. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर ३.६१ टक्क्यांनी घसरुन प्रति पिंप ६३.२१ डॉलर झाले आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स २,०५०.२३ आणि निफ्टी ६१४.८ अंकांनी घसरला. 
 
आशियाई बाजारात हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १३ टक्क्यांहून अधिक घसरला. टोकियोचा निक्केई २२५ अंकांनी घसरला. शांघाय एसएसई कंपोझिट निर्देशांक ७ टक्क्यांहून अधिक घसरला. तर, दक्षिण कोरियाचा कोस्पी ५ टक्क्यांहून अधिक घसरला. युरोपीय बाजारांतही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा केला.  शुक्रवारी अमेरिकेच्या बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. एस अ‍ॅन्ड पी ५०० हा ५.९७ टक्क्यांनी घसरला. नास्डाक कंपोझिट ५.८२, तर डाऊ ५.५० टक्क्यांनी घसरला.
 

Related Articles