तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रूग्णालय दोषी   

महिला आयोगाची माहिती

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारासाठी आगाऊ पैसे न भरल्याच्या कारणावरून उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला असून, अंतिम अहवालाविषयी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती दिली. या अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
चाकणकर यांनी सोमवारी पोलिस आणि वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत आढाव बैठक घेतली. आढावा बैठक घेण्याआधी त्यांनी भिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली. कोणताही व्यक्ती किंवा रुग्ण डॉक्टरांना अनेक खासगी गोष्टी सांगतात. यामागे चांगले उपचार मिळावेत, असा उद्देश असतो. मृत रूग्ण हा १५ मार्चला पहिल्यांदा रुग्ण डॉ. घैसास यांना भेटले होते. रुग्णाची संपूर्ण वैद्यकीय पार्श्वभूमी फक्त डॉक्टरांना माहीत होती. परंतु, ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने चौकशीसाठी जी अंतर्गत समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल दिला त्यात स्वतःला वाचवण्यासाठी जाहीर केला. ज्यामध्ये रुग्णाची गोपनिय माहिती समाजमाध्यमाद्वारे सर्वांच्या समोर आणल्या गेल्या. ही माहिती गोपनिय ठेवण्याचा नियम आहे. त्यामुळे, याप्रकरणी आम्ही रुग्णालयाचा निषेध करतो, असे म्हणून चाकणकर यांनी रूग्णालयाला दोषी मानले.
 
त्या म्हणाल्या, रुग्णालयात ९ वाजून १ मिनिटांनी रूग्ण दाखल झाला. रुग्णाला २ एप्रिलला बोलावले होते; पण २८ मार्चला गर्भवती महिलेला रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी रुग्णालयात येण्यास सांगितले. डॉक्टरांनी संबंधित कर्मचार्‍यांना प्रसूतीसाठी तयारी करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी शस्त्रक्रीयेचीदेखील तयारी केली. रुग्णाला शस्त्रक्रिया विभागात घेऊन जाण्याअगोदर त्यांच्याकडून १० लाखांची मागणी केली. हे सर्व रुग्णासमोरच सुरू होते. रूग्णाचे नातेवाईक सुरूवातीला तीन लाख रुपये भरायला तयार होते. इतर पैशांची व्यवस्था आम्ही उद्यापर्यंत करू, असेही ते म्हणाले. मग मंत्रालयातून आणि इतर विभागातून फोन गेले. तरीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे अडीच वाजता रुग्ण बाहेर पडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही रुग्णावर कोणतेही उपचार झाले नाहीत. उलट तुमच्याकडे असलेली औषधे असतील ते द्या आणि तुमच्या पद्धतीने रुग्णावर उपचार करा, असे रुग्णालयाने सांगितले. या सर्व कालावधित रुग्णाची मानसिकता खचून गेली, असे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
 
नातेवाईकांनी रात्री अडीच वाजता ससून रुग्णालयात रूग्णाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या काळात रुग्णाची मानसिकता खचली होती, त्यामुळे रुग्ण १५ मिनिटांत बाहेर आला. ते रुग्णालयात कोणालाही भेटले नाहीत. तिथून ते सूर्या रुग्णालयात गेले, चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. खचलेली मानसकिता आणि रक्तस्राव यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

दोन अहवाल आज मिळणार

राज्य सरकारने स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीचा अहवाल आला आहे. डॉ. राधाकिशन पवार, डॉ. प्रशांत वाडिकर, डॉ. कल्पना कांबळे, डॉ नीना बोर्‍हाडे या सदस्यांनी हा अहवाल सादर केला आहे. दीनानाथ रुग्णालय, ससून रुग्णालय आणि सूर्या रुग्णालयाचा अहवाल यात दिला आहे. हा मृत्यू माता मृत्यू असल्याने यासंदर्भातील सखोल चौकशी ’माता मृत्यू अन्वेषण समिती’अंतर्गत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व बाबींचा अहवाल अंतिम अहवाल लवकरच जाहीर होईल. तसेच, धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्याचा अहवाल आज सकाळपर्यंत सादर होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महापालिका पाठविणार नोटीस  

पुणे : महापालिकेचे एकही रुपये थकवले नाहीत. एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नसून आम्ही थेट न्यायालयात मिळकतकर भरतो. मिळकतकर आकारणीची व्यावसायिल पध्दतीने केली, त्याविरोधात आम्ही न्यायालयात अर्ज दाखल केली होता. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आम्ही न्यायालयात कर भरतो. असा दावा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय केळकर यांनी केला आहे. मात्र रुग्णालयाचा एकूण थकबाकीचा हिशोब केला असता तब्बल २२ कोटी रुपये थकबाकी असून ही थकबाकी भरण्याबाबतची नोटीस पुणे महापालिकेककडून मंगळवारी पाठवली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयु्क्त पृथ्वीराज बी पी यांनी दिली.
 
दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून तनिशा भिसे या गर्भवती महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार नाकारले होते. त्यामुळे उशिरा उपचार मिळाल्याने तनिशा यांचा मृत्यू झाला. मात्र पैशांअभावी उपचार नाकारणार्‍या मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकत कराची तब्बल २७ कोटींरुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आल्याने पुणेकरांक़डून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. 
 
एरवी सर्वसामान्यांच्या मिळकती जप्त करण्यापर्यंत कारवाई करणारी महापालिका  रुग्णालयाच्या थकबाकीवर एवढी मेहरबान का आहे, असा प्रश्न उपस्थित करुन महापालिकेवर टीकेची झोड उठू लागली आहे. त्यामुळे महापालिकेने रुग्णालयाच्या मिळकत कर थकबाकीचा हिशोब करुन रुग्णालयाकडे सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार २२ कोटी रुपये थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता रुग्णालयाला थकबाकी भरण्याबाबत नोटीस दिली जाणार आहे.
 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मिळकतकर थकबाकीचे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्राविष्ठ आहे. धर्मादाय ट्रस्टच्या आधारे रुग्णालयाला मिळकतकरात सवलत मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच मिळकत करातील सर्वसाधारण मिळकत करात ५० टक्के सवलत देण्याची मागणी रुग्णालयाने केली होती. त्यानुसार रुग्णालयाल मिळकत कराचे बिल महापालिकेकडून देण्यात आले. परंतु त्यांनतरही थकबाकी राहिल्याने आता महापालिकेने नोटिस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयाला आता थकबाकी भरावी लागणार आहे. असे महापालिका प्रशासनाने सांगितले.
 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनकडून चालविले जाते.  महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून रुग्णालयाने मागील सहा वर्षांपासून तब्बल २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपये इतका मिळकतकर थकविल्याचे उघडकीस आले आहे. २०१९-२० ते २०२४-२५ या आर्थिक वर्षांत रुग्णालायकडून मिळकतकराचा एकही रुपया भरलेला नाही. एकीकडे महापालिका मिळकतकर थकबाकीदारांवर कारवाई करत आहे. मात्र मंगेशकर रुग्णालयाने कोट्यवधींचा मिळकतकर थकवूनही अद्याप कारवाई का केली गेली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 

 

Related Articles