रेपो दरात कपात होणार?   

मुंबई : रिझर्व बँकेच्या नाणेविषयक  धोरण समितीची बैठक आज (सोमवार) पासून तीन दिवस चालणार आहे. या बैठकीत व्याजदरात २५ बेसिस पॉइंटची कपात केली जाण्याची शक्यता आहे.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर प्रत्युत्तर शुल्क लादले आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर नवे आव्हान उभे राहणार असून मंदीची शक्यता वर्तविली जात आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतावरदेखील २७ टक्के प्रत्युत्तर शुल्क आकारले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेकडून रेपो दरात कपात केली जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
 
फेब्रुवारी महिन्यात रिझर्व बँकेचे नवनिर्वाचित गर्व्हनर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली नाणेविषयक  धोरण समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत समितीने रेपो दरात २५ बेसिस पॉइटची कपात केली होती. त्यामुळे, रेपो दर ६.५०  वरून ६.२५ टक्क्यांवर आला होता. मे २०२० नंतरची ही पहिली कपात होती. नाणेविषयक  धोरण समितीची ५४ वी बैठक ७, ८ आणि ९ रोजी पार पडणार आहे. या बैठकीतील निर्णय बुधवारी जाहीर केला जाईल.रिझर्व बँकेने फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दर ६.५ टक्के कायम ठेवला होता. त्याआधी, कोरोना महामारीच्या काळात रेपो दरात अखेरची कपात झाली होती. 
 
ट्रम्प यांनी २ एप्रिल रोजी भारत, चीनसह ६० देशांवर ११-४९ टक्के प्रत्युत्तर शुल्क जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी ९ एप्रिलपासून होणार आहे. ट्रम्प यांचा निर्णय भारतासाठी आव्हाने आणि संधी म्हणून पाहिला जात आहे.चीन, व्हिएतनाम, बांगलादेश, कंबोडिया आणि थायलंड यांसारख्या देशांना मोठ्या प्रत्युत्तर शुल्कास सामोरे जावे लागत आहे.भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ६.७ टक्के राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 

Related Articles