पंबन पुलाचे उद्घाटन   

रामेश्वरम, (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील पहिल्या ‘व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रीज‘चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी पुलाखालून जाणारे तटरक्षक दलाचे जहाज आणि नवीन रामेश्वरम-तांबरम (चेन्नई)  या नवीन रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.२.०८ किलोमीटर लांबीचा हा पूल भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि दूरदर्शी पायाभूत सुविधांच्या विकासाचा पुरावा असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. हा पूल रामेश्वरम (पांबन बेट) ते तामिळनाडूतील मंडपम यांना जोडतो. रेल विकास निगम लिमिटेडद्वारे हा पूल उभारण्यात आला आहे. 
 
या पुलात ७२.५ मीटरचा नेव्हिगेशनल स्पॅन आहे जो वरती १७ मीटरपर्यंत उचलता येतो, ज्यामुळे जहाज खालून सुरक्षितपणे जाऊ शकतात. सध्या पूलावरुन ताशी ८० किलोमीटर वेगाने रेल्वे धावू शकते. .या पुलाचे आयुष्यमान १०० वर्षांचे आहे.पूल मजबूत करण्यासाठी, त्यात स्टेनलेस स्टील, विशेष संरक्षक रंग आणि वेल्डेड जॉइंट्सचा वापर करण्यात आला आहे. यामुळे त्याची ताकद आणि आयुष्य वाढले आहे. समुद्राच्या हवेमुळे होणार्‍या गंजापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर एक विशेष पॉलिसिलॉक्सेन लेप आहे.
 
पंबन पूल हा रेल्वेच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या पुलांपैकी एक असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमावेळी तमिलनाडुचे राज्यपाल आर.एन.रवी, अर्थमंत्री थंगम थेनारासू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई, एच.राजा, वनाथी श्रीनिवास आदी उपस्थित होते.

Related Articles