न्यायाधीश लाहोटी यांची बदली   

मालेगाव बॉम्बस्फोट खटला

मुंबई : मालेगावमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटाचा खटला पाहणारे विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांची बदली करण्यात आली आहे. लाहोटी यांची बदली नाशिक जिल्हा न्यायालय येथे करण्यात आली आहे.नियोजित बदलीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी प्रकरणातील पीडितांनी उच्च न्यायालयाला पत्रव्यवहार केला होता. 
 
खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. तसेच, अतिरिक्त न्यायाधीश लाहोटी यांनी खटल्याचे जवळपास संपूर्ण कामकाज पाहिले आहे आणि युक्तिवाद ऐकला आहे. खटल्यात आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांवर सरकारी आणि बचाव पक्षाचा सध्या अंतिम युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे, खटल्याच्या अशा टप्प्यात त्याचे कामकाज पाहणार्‍या न्यायाधीश लाहोटी यांची तूर्त बदली केली जाऊ नये, त्यांच्या नियोजित बदलीला मुदतवाढ देण्यात यावी, असे पीडिताने उच्च न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
 
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलने लाहोटी आणि इतर न्यायाधीशांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे. हा आदेश उन्हाळी सुट्टीनंतर ९ जूनपासून लागू होईल, असेही यात नमूद केले आहे.दरम्यान, शनिवारी पार पडलेल्या सुनावणीत न्यायाधीश लाहोटी यांनी फिर्यादी आणि बचाव पक्षाला १५ एप्रिलपर्यंत उर्वरित युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
 
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथील मशिदीजवळ एका स्फोटात ६ जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणात बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेंतर्गत (आयपीसी) लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांसह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर खटला चालविण्यात येत आहे. त्यातील समीर कुलकणींवरील कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 
 

Related Articles