वक्फ मंडळावर नियंत्रण नाही; कायद्यानुसार कामकाज व्हावे : नड्डा   

नवी दिल्ली : केंद्र सरकार वक्फ मंडळावर नियंत्रण ठेवू इच्छित नाही; परंतु ते कायद्याच्या कक्षेत काम करतात की, नाही हे सुनिश्चित करायचे आहे. जेणेकरून त्यांच्या मालमत्तेचा वापर मुस्लिम समाजातील शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार वाढविण्यासाठी केला जाऊ शकेल, असे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी सांगितले. 
 
भाजपच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त भाजपच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना नड्डा म्हणाले, तुर्की आणि इतर अनेक मुस्लिम देशांच्या सरकारांनी वक्फ मालमत्तांवर ताबा मिळवला आहे. आम्ही फक्त वक्फ  मंडळ चालवणार्‍या लोकांना नियमानुसार काम करण्यास सांगत आहोत. आम्हाला वक्फ मंडळावर नियंत्रण नको आहे. आमचे ध्येय फक्त कामकाज सुनिश्चित करणे आहे. वक्फ मंडळाची मालमत्ता आणि संपत्ती मुस्लिम समुदायाला शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी प्रदान करण्यासाठी समर्पित केली जाईल.
 
दरम्यान, शाहबानो प्रकरणात राजीव गांधी सरकार मुस्लिम समाजातील काही घटकांच्या दबावाला बळी पडून तुष्टीकरणाच्या राजकारणाला बळी पडले. न्यायालयाने मुस्लिम महिलांच्या सुटकेचे आवाहन करूनही निर्णायक कारवाई करण्याचे धाडस कोणाचेच झाले नाही. विशेष म्हणजे, मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशांनी तिहेरी तलाकची प्रथा आधीच रद्द केली होती, तरीही ती भारतात सुरूच होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तिहेरी तलाक रद्द करून मुस्लिम महिलांना सक्षम आणि स्वतंत्र करून ऐतिहासिक पाऊल उचलले.
 
केंद्रातील भाजप सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. १९८७-८८ मध्ये पालमपूरच्या अधिवेशनात अडवाणीजींच्या अध्यक्षतेखाली एक ठराव संमत करण्यात आला होता की, आम्ही रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करू. प्रदीर्घ लढ्यानंतर भव्य राम मंदिर बांधले गेले, असेही ते म्हणाले.
 

Related Articles