भारतीय नौदलाकडून पाकिस्तानी क्रू मेंबरला वैद्यकीय मदत   

नवी दिल्ली : मध्य अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने ओमान किनारपट्टीजवळ मासेमारी करणार्‍या जहाजावरील पाकिस्तानी क्रू मेंबरला तातडीची वैद्यकीय मदत केली.
 
नौदलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ओमानच्या किनार्‍यापासून जवळपास ३५० सागरी मैल पूर्वेला कार्यरत असलेल्या जहाजातील एका क्रू मेंबरच्या बोटांना गंभीर दुखापत झाली होती. 
 
भारतीय नौदलाच्या ’आयएनएस त्रिकंद’ या स्टेल्थ युद्धनौकेतील नौ सैनिकांना याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ आपला मार्ग बदलला. आयएनएस त्रिकंदचे वैद्यकीय अधिकारी मार्कोस आणि जहाजाच्या वैद्यकीय पथकासह मदत देण्यासाठी जहाजावर चढले. जखमी पाकिस्तानी क्रू मेंबरला फ्रॅक्चर आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. जखमीला अ‍ॅनेस्थेसिया दिल्यानंतर तीन तास शस्त्रक्रिया झाली, रक्तस्त्राव वेळीच नियंत्रित करण्यात आला.एफव्ही अब्दुल रेहमान हंझिया या जहाजामध्ये ११ पाकिस्तानी आणि पाच इराणी सैनिकांचा समावेश होता. हे जहाज इराणला पोहचेपर्यंत जखमीला बरे होण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्यही पुरविण्यात आले.
 

Related Articles