टँकरखाली सापडून बालकाचा मृत्यू   

पुणे : टँकर मागे घेत असताना बेफिकीर चालकामुळे दोन वर्षाच्या बालकाचा टँकरखाली सापडून जागीच मृत्यू झाला. वारजे माळवाडी भागातील गणपती माथा येथील अमर गार्डन सोसायटीजवळ सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.अधीक्षक महेश वहाळे (वय २) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. वारजे पोलिसांनी याप्रकरणी सनी प्यारे बारस्कर (वय-३, सध्या रा. वडाचा गणपती मंदिराजवळ, दत्तवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी टँकर चालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सतीश वसंत टिकारे (वय- ६५, रा. टिकारे हाईट्स, गणपती माथा, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
 
वारजे भागातील गणपती माथा परिसरातील रहिवासी छाया वहाळे यांचा नातू अधीक्षक शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरासमोर खेळत होता. या परिसरातील एका इमारतीतील टाकीत पाणी भरण्यासाठी टँकर आला होता. त्यावेळी टँकर मागे नेत असताना घरासमोर खेळणारा अधीक्षक मागच्या चाकाखाली सापडला. त्यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी टँकर चालक बारस्करला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. 
 
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलिसांनी टँकर मालकाविरूध्द देखील गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशीरा कुटुंबियांकडून बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे करत आहेत.  
 

Related Articles