इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञान वापराने साखर कारखान्यांच्या नफ्यात मोठी वाढ शक्य   

माजी मंत्री राजेश टोपे यांचे प्रतिपादन

पुणे : इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती घेत, विद्यमान यंत्रसामग्रीचा योग्य वापर करीत आणि धान्य आधारित तंत्रज्ञान स्वीकारून साखर कारखाने संपूर्ण वर्षभर कार्यरत राहू शकतात. इतकेच नव्हे तर यामुळे  कार्यक्षमता आणि नफा यामद्ये वाढ होऊ शकते असे प्रतिपादन माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले.
 
बायो एनर्जी सोल्युशन्समध्ये जागतिक पातळीवर अग्रगण्य मानल्या गेलेल्या प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने पुण्यात नुकत्याच एका तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी टोपे बोलत होते. इथेनॉल डिस्टिलरीजमध्ये धान्य-आधारित अ‍ॅड-ऑन मॉड्यूल्सद्वारे इथेनॉल उत्पादन विस्तारासोबतच भारतातील इथेनॉल मिश्रणाच्या वाढत्या संधींवर आणि जैवइंधन क्षेत्रातील नवकल्पनांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. प्राज इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, प्राजच्या बायोएनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे, या उद्योगाशी संबंधी तज्ज्ञ, संस्था आणि विविध भागधारक यावेळी आवर्जून उपस्थित होते. विद्यमान संसाधनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करून धान्य-आधारित मॉड्यूल्सच्या जोडणीद्वारे इथेनॉल उत्पादन कसे वाढवता येईल, यावर  कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला होता.
 
ही कार्यशाळा साखर उद्योगासाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि योग्य वेळी आयोजित करण्यात आली असल्याचे सांगत टोपे म्हणाले, कचर्‍यापासून उर्जानिर्मिती ही संकल्पना पुढारलेली असून यामुळे इथेनॉल उत्पादन वाढणार आहेच शिवाय साखर कारखान्यांची आर्थिक शाश्वतता देखील सुधारेल. नजीकच्या भविष्यात या संकल्पनेमुळे भारताच्या जैवइंधन उद्दिष्टांना गती मिळेल. परंतु योग्य किमतीत कच्चा माल उपलब्ध होणेही या कार्यक्रमाच्या यशासाठी महत्त्वाचे ठरेल. असेही टोपे यांनी नमूद केले.  
 
कार्यशाळेत बोलताना, डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, भारत इ २० च्या पुढे जात असताना, इथेनॉल उत्पादनासाठी अधिकाधिक फीडस्टॉकचा वापर करणे, उत्पादन कार्यक्षमता वाढवणे आणि जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे हे अत्यावश्यक आहे. 
 

Related Articles