अनोख्या तंत्रासह डक्टल स्टेंटिंग प्रक्रियेमुळे जन्मजात हृदयदोष असलेल्या नवजात शिशुला नवजीवन   

लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने अनोख्या तंत्रासह जन्मजात हृदयदोष असलेल्या नवजात शिशुवर यशस्वीरित्या डक्टल स्टेंटिंंग प्रक्रिया केली. या बाळाला प्रक्रियेनंतर तीन दिवसांतच डिस्चार्ज देण्यात आला. या जीवनदायी शस्त्रक्रियेमुळे १० महिन्यानंतर आवश्यक असलेल्या पुढच्या सुधारात्मक शस्त्रक्रियेसाठी मार्ग मोकळा झाला आहे. डॉक्टरांच्या टीममध्ये बाल हृदयरोगतज्ज्ञ  डॉ. आशिष बनपूरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. योगेश भुट्टियानी, सहायक बालरोगतज्ज्ञ डॉ. विष्णू जाधव आणि मुख्य भूलतज्ज्ञ डॉ. विठ्ठल शेंडगे यांचा समावेश होता.
 
इंदापूर येथील या नवजात बालकाला क्रिटिकल सायनोटिक जन्मजात हृदयरोग (रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी असल्याची स्थिती असलेला जन्मजात हृदयरोग) असल्याचे निदान झाले होते. आईच्या पोटात असल्यापासूनच तपासण्यांमध्ये याबाबत डॉक्टरांना शंका होती आणि जन्मानंतर काही तासांतच गर्भाच्या इको तपासणीत याची पुष्टी झाली.याबाबत माहिती देताना बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. आशिष बनपूरकर म्हणाले की, जेव्हा हे बाळ आमच्या रूग्णालयात दाखल झाले तेव्हा त्याची ऑक्सिजनची पातळी (एसपीओ२) ४०% पर्यंत खाली आली होती. सामान्यत: ही पातळी ९६ पेक्षा वर हवी. बाळाचे वजन हे २.१ किलो होते आणि बाळाची स्थिती अतिशय नाजूक होती.या बाबतीत फुफ्फुसाला प्राणवायू पुरवठा करणारी धमनी बंद होती. या स्थितीला टेट्रॉलॉजी ऑफ फ्लो विथ पल्मनरी ट्रेसिया (टीओएफ/पीए) असे म्हणतात. ही स्थिती म्हणजे फुफ्फुसाच्या धमनीच्या व्हॉल्व आणि रक्तपुरवठ्यावर परिणाम करणारा गंभीर जन्मजात हृदयदोष आहे.
 
डॉ. बनपूरकर म्हणाले की, अशा परिस्थितीत बाळाला स्थिरस्थावर करून प्राणवायूची पातळी किमान सुसह्य पातळीवर आणणे आणि त्यानंतर प्रक्रिया करणे गरजेचे होते. यासाठी प्राणवायू मार्गातील स्नायूंचे आकुंचन व प्रसरण नियंत्रित करण्यासाठी प्रोस्टाग्लान्डिन हे औषध देण्यात आले. यामुळे प्राणवायूची पातळी ८५ पर्यंत गेली. बाळ स्थिरस्थावर झाल्यावर एनआयसीयूमधील ऑक्सिजन सपोर्ट काढून टाकण्यात आला. मात्र या औषधाचा प्रभाव जास्त काळ टिकत नसल्याने तातडीने प्रक्रिया करण्याची गरज होती. त्यामुळे आम्ही डक्टल स्टेंटिंंग प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेत डक्टस आर्टरियोससमध्ये स्टेंट टाकली जाते.
 
डक्टस आर्टरियोसस ही एक तात्पुरती रक्तवाहिनी असते, जी जन्मानंतर बंद होते. बंद न झाल्यास त्याला पेटंट डक्टस आर्टरियोसस (पीडीए) असे म्हणतात.
डक्टल स्टेंटिंग प्रक्रियेमुळे डक्टस आर्टरियोसस वाहिनीच्या माध्यमातून फुफ्फुसाच्या धमनीपर्यंत रक्तपुरवठा होऊ शकतो. हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी यामुळे फुफ्फुसातील धमनी विकसित होण्यात वेळ मिळतो आणि पुढील सुधारात्मक शस्त्रक्रिया पार पडू शकते.डॉ. बनपूरकर म्हणाले की, या प्रक्रियेमध्ये पर्क्युटेनस ट्रान्सकॅरोटिड प्रोच हे तुलनेने नवीन तंत्र वापरले गेले. या तंत्रामध्ये मांडीच्या सांध्याऐवजी स्टेंट टाकण्यासाठी मानेच्या धमनीचा वापर करण्यात आला. या तंत्रामुळे पीडीए पर्यंत पोहोचण्यासाठी आणि चांगली दृश्यमानता प्राप्त करण्यासाठी मदत झाली.
 
डॉ. बनपूरकर पुढे म्हणाले की, डक्टल स्टेंटिंग ही हल्लीच्या काळातील विशेष करून नवजात हृदयरोग विकारांसाठी एक अभिनव प्रक्रिया आहे आणि याचे चांगले परिणाम दिसून येतात. मात्र यासाठी रूग्णाची पात्रता पडताळून पाहावी लागते. वैयक्तिक गरजांनुसार अशा विकारांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
 
सामान्यत: अशा जन्मजात हृदयविकारांमध्ये बीटी शंट (ब्लालॉक - थॉमस - टॉसिग शंट) ही प्रक्रिया केली जाते. मात्र डक्टल्स स्टेंटिंग हा कमीत कमी छेद असलेला चांगला पर्याय आहे. विश्वराज हॉस्पिटल येथील नवजात शिशु चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत शहारे म्हणाले की, पाठपुरावा करण्यासाठी नुकतेच पालक या बाळाला एक महिन्यानंतर रूग्णालयात घेऊन आले होते आणि आता या बाळाची तब्येत चांगली आहे. फुफ्फुसामधील वॉल्व्ह आणि हृदयातील छिद्र हा त्या बाळामध्ये जन्मजात हृदयविकार असून १० महिन्यांनी सुधारात्मक शस्त्रक्रिया केली जाईल. डक्टल्स स्टेंटिंगमुळे बाळाला आराम आणि पुढील शस्त्रक्रियेसाठी वेळ मिळाला आहे. हे बाळ इतरांप्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकेल.
 

Related Articles