नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी ही आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी महत्त्वपूर्ण   

नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी ही आरोग्यदायी आयुष्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले. दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृती केली जाते. यावर्षीची संकल्पना ‘हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर्स’ ही असून माता व नवजात बालकांच्या आरोग्यावर केंद्रित आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांर्तगत सरकारने नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी करण्याची शिफारस केली आहे. यातूनच सर्वांगीण विकास आणि चांगल्या भविष्यासाठी सुरूवातीच्या काळातच केल्या जाणार्‍या डोळ्यांच्या तपासणीचे महत्त्व अधोरेखित होते. एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुचेता कुलकर्णी म्हणाल्या की, जन्माच्या पहिल्या वर्षात डोळ्यांच्या संभाव्य आजारांसाठी नवजात बालकांची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये जन्मजात असलेला मोतीबिंदू, रेटिनोब्लास्टोमा (डोळ्यांचा कर्करोग), काचबिंदू आणि मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी यासाठीच्या तपासण्या यांचा समावेश आहे. जन्म झाल्यानंतर पहिल्या महिन्यात साध्या २ ते ३ चाचण्यांद्वारे डोळ्यातील संभाव्य असामान्यतेचे निदान केले जाऊ शकते. यानंतर तीन वर्षे वय होण्यापूर्वी नियमित डोळ्यांची तपासणी करावी. त्या पुढे म्हणाल्या की, एकीकडे बालमृत्यू दर कमी होत असताना चांगले जीवनमान आणि सर्वांगीण विकासासाठी डोळ्यांच्या आरोग्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. लवकर निदान केल्यास संभाव्य अंधत्व टाळता येऊ शकते.
 
आता प्रत्येक शाळेमध्ये, विशेष करून शहरी भागात डोळे व आरोग्य तपासणी नियमित केली जाते, ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र शाळेत जाण्यापूर्वीचा काळ (१ ते ६ वर्षे) हे डोळ्यातील असामान्यता ओळखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळेच नवजात बालकांच्या डोळ्यांच्या तपासणीबरोबरच पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक- डॉ. कुलदीप डोळे यांनी व्यक्त केले. पालकांनी नियमित डोळ्यांच्या तपासणीसाठी पाठपुरावा केला पाहिजे. बुब्बुळात जर पांढरा ठिपका आढळल्यास किंवा तिरळेपणा निदर्शनास आल्यास, जर बालकांची नजर एके ठिकाणी स्थिर होत नसेल तर त्वरित नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधावा. कारण ही डोळ्यांच्या आजाराची लक्षणे असू शकतात. नवजात शिशूंमध्ये जन्मजात आजारांचे निदान करणे महत्त्वाचे असते. याशिवाय ज्या पालकांच्या चष्म्याचा नंबर जास्त असेल त्यांनी नवजात शिशूंची तपासणी आणि त्यानंतर नियमित तपासणी व पाठपुरावा करणे गरजेचे आहे. सामान्य बालकांच्या तपासणीमध्ये रेड रिफ्लक्स (डोळ्यांच्या बाहुल्यांवर चमकदार प्रकाश टाकून केली जाणारी चाचणी) वापरून तपासणी केली जाते. याशिवाय सखोल मूल्यांकनासाठी अल्ट्रासाऊंड किंवा इमेजिंगसारख्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी आरओपी चाचणी केली जाते. यामध्ये डोळ्यात विशिष्ट ड्रॉप्स टाकून बाहुल्यांचा आकार मोठा करून प्रकाशाद्वारे नेत्रपटल व इतर भागांची तपासणी केली जाते.
 
योग्य स्तनपान, डोळ्यांची तपासणी आणि ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास त्याचे लवकर निदान करणे हे नवजात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तीन महत्त्वाचे घटक असतात. डोळ्यांची तपासणी ही कोणत्याही बाळाच्या निरोगी आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असते. पालक लवकर निदानाला प्राधान्य देऊन बाळाची दृष्टी आणि एकंदर आरोग्याचे रक्षण करू शकतात.
 

Related Articles