ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका रस्त्यावर   

दीडशेहून अधिक संघटनांची हजाराहून अधिक ठिकाणी निदर्शने 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या विरोधात संपूर्ण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आंदोलने आणि निदर्शने करण्यात आली. सरकारी कर्मचारी कपात, अर्थव्यवस्था, मानवी हक्क आणि अन्य मुद्दांचा निषेध म्हणून अमेरिकेतील जनता लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरली आहे. 
 
दीडशेहून अधिक संघटनांनी १,२०० हून अधिक ठिकाणी निदर्शने केली. यामध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, एलजीबीटीक्यू, वकील, माजी जवान, निवडणूक अधिकारी आदी सहभागी झाले होते.ट्रम्प आणि मस्क यांच्या धोरणांचा निषेध म्हणून अमेरिकेतील सर्व ५० राज्यांच्या राजधानीत आंदोलने करण्यात आली. सरकारी कार्यालये आणि महत्त्वाच्या संस्थांसमोरदेखील मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. वॉशिंग्टनमध्येदेखील मोठी निदर्शने झाली.
 
हजारो कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकणे, सामाजिक सुरक्षा प्रशासनाची प्रादेशिक कार्यालये बंद करणे, स्थलांतरितांना हद्दपार करणे आणि ट्रान्सजेंडर लोकांसाठी संरक्षण कमी करणे याचा निषेध म्हणून ही निदर्शने करण्यात आली. आमच्या अधिकारांपासून लांब रहा, अशा घोषणा यावेळी दिल्या जात होत्या.  ट्रम्प यांचे सल्लागार आणि टेस्ला, स्पेसएक्स आणि ‘एक्स’ या समाज माध्यमाचे मालक मस्क सरकारी खर्च कमी करण्यासाठी पावले उचलत आहेत. ते सरकारी दक्षता विभागाचे प्रमुख आहेत. मस्क यांच्या मते ते करदात्यांच्या अब्जावधी डॉलर्सची बचत करत आहेत.
 
अमेरिकेच्या आवास आणि शहरी विकास विभागाचे वकील आणि कामगार संघटनेचे  सदस्य पॉल ओसा डेबे यांनी ट्रम्प, मस्क आणि प्रशासनातील इतरांवर टीका करताना या सर्वांना कर्मचार्‍यांच्या कामांचे महत्त्व नाही, असा आरोप केला. ते अब्जाधीश आणि धनिकांव्यतिरिक्त अन्य कशालाही महत्त्व देत नाहीत. अब्जाधीशांनी सत्ता बळकावली असून याचा निषेध म्हणून आम्ही निदर्शने करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
ट्रम्प प्रशासनातील अब्जाधीशांचे अधिग्रहण आणि भ्रष्टाचार संपवणे, मेडिकेड आणि सामाजिक सुरक्षे सारख्या आवश्यक कार्यक्रमांमध्ये संघीय निधीमध्ये कपात रोखणे, स्थलांतरित, ट्रान्सजेंडर समुदाय आणि इतर गटांवरील हल्ले थांबवणे यासाठी ही आंदोलने केली जात आहेत, असेही ते म्हणाले.दरम्यान, लंडन आणि पॅरिससारख्या शहरांमध्येही काही निदर्शने झाली. डेमोक्रॅटिक खासदार जेमी रस्किन आणि भारताविरुद्ध विष ओकणार्‍या इल्हान ओमर यांनीही यात भाग घेतला. त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली. 
 

Related Articles