भारत-श्रीलंकेत संरक्षण करार   

कोलंबो : भारत आणि श्रीलंकेमध्ये संरक्षणासह सात अन्य करार शनिवारी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अरुण कुमारा दिस्सानायके यांनी करारांवर स्वाक्षरी केली. सीमावर्ती क्षेत्रात सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध वाढविण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. त्याबाबत सखोल चर्चा देखील दोन्ही नेत्यांनी केली.
 
थायलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या दौर्‍यावर आले आहेत. या प्रसंगी त्यांनाश्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान मित्र विभूषणने गौरविण्यात आले .दरम्यान, दोन्ही देशांतील संरक्षण करार धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चार दशकांपूर्वी भारताचे शांतता पथक श्रीलंकेत होते. त्यानंतर प्रथमच संरक्षण विषयक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 
 
मोदी म्हणाले, दोन्ही देशांंना संरक्षण हेतू सारखेच आहेत. दोन्ही देश संरक्षणात एकमेकांशी बांधले गेले असून एकमेकांवर अवलंबून आहेत. संरक्षण सहकार्य कराराचे भारत स्वागत करत आहे. भारताच्या संवेदनशील हिताकडे लक्ष दिल्याबद्दल मी दिस्सानायके यांचे आभार मानतो. दिस्सानायके म्हणाले, श्रीलंकेची भूमीचा गैरपवार भारताविरोधात केला जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. भारताचे हित जोपासण्यावर भर असेल. कठीण आर्थिक संकटात भारताने श्रीलंकेला केलेली मदत कधीही विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, अन्य करारामध्ये श्रींलंकेतील संपूर सौर ऊर्जा प्रकल्प, दोन्ही देशांत बहुउद्देशीय वाहिनी टाकणे, त्रिंकोमलीला ऊर्जा केंद्र बनविणे, दोन देशांत वीज पुरवठा वाहिन्या टाकणे, श्रीलंकेला जवळचा देश म्हणून विशेष दर्जा, शेजारी पहिला आणि महासागर दृष्टिकोनाचा भाग बनविणे यांचा समावेश आहे. थायलंड दौर्‍यातही मोदी यांची भेट दिस्सानायके यांनी घेतली होती. 

Related Articles