रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार   

कीव्ह : रशियाने युक्रेनचे मध्यवर्ती शहर क्रिवी रिहवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात नऊ मुलांसह १९ जण ठार झाले. तर ५० हून अधिक जखमी आहेत. अमेरिका आणि युरोपीय अधिकारी युद्धविराम स्वीकारण्यासाठी रशियावर दबाव आणत असतानाच हा हल्ला झाला. त्यामुळे निप्रॉपेट्रोव्स्क प्रदेशाचे प्रमुख सेर्ही लिसाक यांनी या रशियन हल्ल्याचे वर्णन नागरिकांविरूद्धचे युद्ध म्हणून केले. क्रिवी रिह शहराच्या संरक्षण प्रशासनाचे प्रमुख ओलेक्जेंडर विलकुल म्हणाले, रशियाने डागलेले एक क्षेपणास्त्र थेट निवासी क्षेत्रात कोसळले. स्फोटामुळे पाच निवासी इमारती कोसळल्या आणि अनेक ठिकाणी आग लागली. घटनास्थळाजवळ एक मैदान होते. मैदानात खेळणार्‍या ९ मुलांसह १९ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ५० जण जखमी असून, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
   
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. युद्ध संपविण्याच्या रशियाच्या अनिच्छेबद्दल निराशा व्यक्त करत ते म्हणाले, क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या साह्याने केले जाणारे हल्ले हे सिद्ध करतात की, रशियाला  युद्धच हवे आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिका, युरोपसह इतर मित्रराष्ट्रांना युक्रेनचे हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी आणि युद्ध थांबवण्यासाठी मॉस्कोवर दबाव वाढविण्याचे आवाहन केले आहे. कोणाला शांतता हवी आहे आणि कोणाला युद्ध हवे आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने टेलिग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये दावा केला आहे की, एका रेस्टॉरंटमध्ये युनिट कमांडर आणि प्रशिक्षकांच्या बैठकीला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्लयात युक्रेनचे ८५ सैनिक आणि अधिकारी तसेच २० वाहनांचे नुकसान झाले आहे. 

Related Articles