अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले   

ट्रम्प यांनी शेअर केली चित्रफीत
 
वॉशिंग्टन : येमेनमध्ये अमेरिकेचे इराण समर्थित हुथी बंडखोरांवर हल्ले सुरूच आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हुथी बंडखोरांवर केलेल्या हल्ल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. गोलाकार उभे असलेल्या हुथींवर ड्रोनने हल्ला करुन क्षणार्धात संपूर्ण परिसर धुळीच्या आणि धुराच्या साम्राज्यात बदलल्याचे त्यामध्ये दिसते. या ड्रोन हल्ल्यात २५ सेकंदात ७० ते ८० हुथी बंडखोर मारले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही चित्रफीत केवळ राजकीय दृष्टिकोनातूनच नाही तर जागतिक रणनीतीच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरली आहे. 
 
ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या चित्रफीतीला एक कॅप्शन दिले आहे. ‘हे हुथी बंडखोर हल्ला करण्यासाठी एकत्र आले होते. अरेरे.., आता या हुथी बंडखोरांकडून कोणताही हल्ला होणार नाही! ते पुन्हा कधीही आमची जहाजे बुडवणार नाहीत!‘, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बॉम्ब फेकणार्‍या लढाऊ विमानातून ही २५ सेकंदाची चित्रफित रेकॉर्ड करण्यात आली. ७० ते ८० लोक जमिनीवर वर्तुळात उभे आहेत. त्यानंतर विमानातून या वर्तुळात बॉम्ब टाकण्यात आला आणि मोठा स्फोट झाला. सर्वत्र धुराचे लोट दिसू लागले. काही वेळाने तिथे एकही माणूस दिसत नाही. फक्त त्या ठिकाणी खोल खड्डा दिसतो. सर्व हुथी बंडखोर या हल्ल्यात मारले गेले. 
   
दरम्यान, ट्रम्प प्रशासन इराणच्या वाढत्या आण्विक कार्यक्रमावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याने अमेरिकेची मोहीम थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे इराण समर्थित हुथींवर सातत्याने हवाई हल्ले सुरूच आहेत. बुधवारी अमेरिकेने येमेनमधील हुथी बंडखोरांच्या ताब्यातील भागात हवाई हल्ले केले. यात सहाजण ठार झाले होते. 

Related Articles