रामनवमी सोहळ्यासाठी मंदिरे सज्ज   

मिरवणुकीचे आयोजन; श्रीराम मंदिरे विद्युत रोषणाईने उजळली

पुणे : प्रभू श्रीराम जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी मंदिरे सज्ज झाली आहेत. त्यानिमित्त दिवसभर पार पडणार्‍या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारीही मंदिरांनी पूर्ण केली आहे. रंगीबेरंगी फुलांच्या माळाची सजावट, गाभार्‍यात पताक्याची सजावट, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि प्रत्यक्ष राम नवमी सोहळ्याची मंदिरात सुरू असलेली लगबग असे चैतन्यपूर्ण वातावरण श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला शनिवारी श्रीराम मंदिरांमध्ये पाहायला मिळाले. 
 
आज (रविवारी) श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.  मंदिरांमध्ये यानिमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरांमध्ये जय जय श्रीरामचा जयघोष दुमदुमणार असून मंदिरांमध्ये श्री रामजन्माचे कीर्तन, अभिषेक, महाआरतीसह श्रीराम जन्माचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तर शहर आणि उपनगरात विविध संस्था आणि राजकीय पक्षांकडून आज मिरवणुका काढण्यात येणार आहे. या मिरवणुकांची तयारीही पूर्ण झाली आहे.
 
श्रीराम नवमीनिमित्त मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्मसोहळा साजरा करण्यात येणार आहे. तसेच श्री रामजन्माचे कीर्तन, अभिषेक, महाआरतीसह दुपारी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात आणि रामनामाचा नामघोष करत जन्मसोहळ्याचा उत्सव साजरा करण्यात येईल. भजन-कीर्तन, प्रवचन, व्याख्याने आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळनंतर मंदिरांसह संस्था-संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने मिरवणुका काढण्यात येणार आहेत. घराघरांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करण्यात येणार आहे. काही संस्थांच्या वतीने गीत रामायणाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत.
 
श्री रामजी संस्थान तुळशीबागच्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात उत्सवाचे आयोजन केले आहे. सकाळी साडेदहा वाजता दर्शनबुवा वझे यांचे प्रभू श्रीराम जन्माचे कीर्तन होईल. तर दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्मसोहळा होणार आहे. रात्री साडेसात वाजता छबिना मिरवणूकीचे आयोजन केले आहे.
 
मंडई परिसरात खरेदीसाठी गर्दी
 
राम नवमीनिमित्त विविध प्रकारची फुले, पुजेचे साहित्य व प्रसाद खरेदी करण्यासाठी नागरिकांची महात्मा फुले मंडईत दुपारनंतर गर्दी झाली होती. त्यामुळे मंडई परिसर नागरिकांच्या गर्दीने फुलला होता. विशेष म्हणजे फुले, फुलांच्या माळा आणि पूजेच्या साहित्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत ग्राहकांकडून मंडई परिसरात खरेदी सुरू होती. 
 
मध्य वस्तीत वाहतूक कोंडी 
 
शनिवारची सुट्टी तसेच राम नवमीनिमित्त खरेदीसाठी घराबाहेर पडलेले नागरिक तसेच मंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे शनिवारी दुपारपासूनच मध्य वस्तीतील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर रात्री उशीरापर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना घरी पोहचण्यास विलंब झाला. 

Related Articles