दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू   

नातेवाईकांचा आरोप, एकीची प्रकृती गंभीर 

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून एकीची प्रकृती गंभीर आहे. दूषित पाण्यामुळेच दोन मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ममता उर्फ भाग्यश्री म्हेत्रे (वय १४) आणि जिया म्हेत्रे (वय१५) अशी दूषित पाण्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या दोन शाळकरी मुलींची नावे आहेत. तर जयश्री म्हेत्रे हिच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दोन मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 
 
दरम्यान मृतदेह रस्त्यावर ठेवूनच या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली. शनिवार पाण्याचा दिवस असताना नळाद्वारे घाण पाणी आल्याचे दिसून येत होते. दोन दिवस मुलींना पाणी पिल्यामुळे उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला, अशा परिस्थितीत गरिबीमुळे मोठ्या रुग्णालयात नेहमी शक्य नसल्यामुळे ममता अशोक म्हेत्रे या मुलीला दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
 
प्रकृती गंभीर बनल्यामुळे अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आणि उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक महिलेने सांगितले. तर जिया आणि जयश्री महादेव म्हेत्रे या दोन सख्खा बहिणींना शुक्रवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील जिया हिचा शनिवारी उपचार सुरू असताना सकाळी मृत्यू झाला आहे. तर जयश्री म्हेत्रे हिची प्रकृती गंभीर आहे.

Related Articles