गर्भलिंगनिदान करणार्‍या सोनोग्राफी सेंटर व रुग्णालयांवर कठोर कारवाई करा   

युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची आरोग्य मंत्री आबिटकर यांच्याकडे मागणी

पुणे : दौंड तालुक्यातील गोपाळवाडी जिजामाता नगर परिसरात उकिरड्यावर प्लास्टिक बरण्यांमध्ये अर्भके व मानवी शरीराचे अवयव आढळून आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. एका कचरा वेचकाला पुठ्ठ्याच्या बॅाक्समध्ये अर्भके आढळली. दौंड पोलिसांनी या प्रकरणी गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर राज्यात सोनोग्राफी सेंटर व हॉस्पिटलच्या माध्यमातून अवैधपणे गर्भलिंनिदान चाचण्या व गर्भपात सुरु असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. यासाठी गर्भलिंगनिदान करणार्‍या सोनोग्राफी सेंटर व रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे दिले.
 
एकीकडे केंद्र व राज्य सरकार स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी व गर्भलिंनिदान चाचण्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत आहे. दुसरीकडे मात्र अवैधपणे गर्भलिंनिदान व भ्रूणहत्या यांचे वाढलेले प्रमाण ही चिंतेची बाब आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यभरात सोनोग्राफी सेंटरमध्ये व हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान चाचण्या होत आहेत.  व अमानुष पद्धतीने गर्भपात घडवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीभ्रूण हत्या जास्त प्रमाणात होत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोनोग्राफी सेंटर मधून गर्भनिदान चाचण्या होत आहेत का नाही याबाबत तपासण्या आणि चौकश्या होणे गरजेचे आहे.  सातारा जिल्ह्यात रुग्णवाहिकेत अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. असाच प्रकार राज्यात सर्वत्र दिसून येत आहे.
 
राज्यात गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच गर्भलिंगनिदान चाचणी करणार्‍या सोनोग्राफी सेंटर व हॉस्पिटलवर छापेमारी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी सुरवसे-पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवदनाद्वारे केली आहे.  ज्या रुग्णालयात अथवा सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या जातात अश्या ठिकाणी छापेमारी करून कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत असे मंत्री आबिटकर यांनी सांगितल्याचे सुरवसे-पाटील म्हणाले.

Related Articles