जनतेचे सेवक समजून कामे करा   

मुख्यमंत्र्यांचा अधिकार्‍यांना सल्ला 

पुणे : जनतेचे सेवक आहोत अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कामे करा, तरच प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रभावीपणे राबविता येईल, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अधिकार्‍यांना दिला.महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, राज्याचे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते.
 
फडणवीस म्हणाले, महसूल विभागातील विविध बाबी, रचना, कार्यपद्धती, महसूली कायदे आदींमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांच्या शिफारशींवर चर्चा करुन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या १५ ऑगस्टपासून करण्याचा प्रयत्न आहे. महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे. नागरिकांशी सर्वाधिक जोडलेला गेला असल्याने या विभागाच्या कार्यक्षमतेवर, पारदर्शकतेवर आणि उत्तरदायित्वावर शासनाचे मूल्यमापन केले जाते.शासनामध्ये काम करणार्‍या अधिकार्‍यांनी त्यांचा जमिनीवर काम करण्याचा अनुभव एकत्रितपणे मांडण्याचे काम केले तर अधिक चांगल्या प्रकारे काम होऊ शकते. पुढील पाच वर्षे आपल्याला किती काम करायचे आहे त्याचा वास्तुपाठ म्हणून शंभर दिवसाचा कार्यक्रम घेतला होता, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

Related Articles