दोषींवर कठोर कारवाई होणार   

महिलेच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन 

पुणे : दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले आहे. या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. अशा घटना रुग्णालयात घडणे चुकीचे आहे. याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.
 
देवेंद्र फडणवीस यांनी काल भिसे कुंटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना  ते म्हणाले, पीडित महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून एसओपी तयार झाली पाहिजे. या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाची सगळी चूक आहे असे म्हणण्याचे कारण नाही. मात्र, घडलेला प्रकार असंवेदनशीलच होता. जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावे लागेल. ती सुधारावी लागेल. जर चूक सुधारण्याचा प्रयत्न होत असेल तर मला त्याचा आनंद आहे.
 
नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये काही बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. संपूर्ण धर्मादाय व्यवस्था ही ऑनलाइन वर एका क्लिकवर यावी, यासाठी हा प्रयत्न आहे. जेणेकरून आपल्याकडे कुठे किती खाटा उपलब्ध आहेत, त्या रुग्णांना दिल्या जातात की नाही यावर लक्ष ठेवता येईल. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात असलेला मुख्यमंत्री आरोग्य कक्षही याच्याशी जोडण्याचा प्रयत्न आहे. समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही. तोपर्यंत बोलणे योग्य ठरणार नाही. रूग्णालयाबाहेर पक्ष, संघटना आंदोलन करत आहेत. तशी आंदोलन करणे योग्य नाही. शो बाजी बंद झाली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.     
 
तसेच घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चुकीचे असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भिसे कुंटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत ज्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई करू, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अलंकार पोलिस ठाण्यात पोलिसांनी भिसे कुंटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला. घटनेच्या प्रारंभीपासून आम्ही जे सांगत आहोत. तसेच आमच्यासोबत जे जे घडले त्याची माहिती पोलिसांना दिली असल्याचे भिसे कुंटुबीयांनी सांगितले. 
 
महापालिकेनेही बजावली नोटीस
 
महाराष्ट्र राज्य सरकारने १४ जानेवारी २०२१ रोजी काढलेल्या अधिसूचनेतील नियम ११ (जे) मधील अनु क्र. १ ते ३ पालन करण्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. दि बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक १४ जानेवारी २०२२मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे ही नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधित डॉक्टरांच्या खुलासा पत्रासह सादर करावा, अशी नोटिस महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी मंगेशकर रूग्णालयाला बजावली आहे.
 
प्राथमिक चौकशीत रूग्णालयावर ठपका 
 
• आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. समितीने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयावर मोठा ठपका ठेवला आहे. उपचारासाठी आलेल्या गर्भवतीला रूग्णालयात दाखल करून घ्यायला हवे होते. मात्र, दाखल करून घेतले नाही, ही मोठी चूक झाली, असे अहवालात म्हटले आहे. समितीच्या अध्यक्षांनी अहवाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. सविस्तर अहवाल तयार करण्याचे समितीचे काम सुरूच आहे. पुढील दोन दिवसांत समिती सविस्तर अहवाल सादर करणार आहे. रूग्णाशी संबंधित सर्व कागदपत्रे, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल याचा समिती अभ्यास करत आहे.
 
छतावर आंदोलन 
 
• लहुजी शक्ती सेनेने दीनानाथ रुग्णालयासमोर शनिवारी आंदोलन केले. आंदोलकांपैकी काही जण रुग्णालयाच्या छतावर चढले. डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर जोपर्यंत ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. छतावरील आंदोलकांना खाली उतरवताना मात्र पोलिसांची दमछाक झाली. आंदोलकांना विनंती करून छतावरून उतरविण्यात आले. 

Related Articles