अनामत रक्कम घेणार नाही; रूग्णालयाचा निर्णय   

गर्भवतीच्या मृत्यूनंतर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तात्काळ सेवेच्या वेळी (इमर्जन्सी) कोणत्याही रूग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम न घेण्याचा निर्णय रूग्णालयाने घेतला आहे. वैद्यकीय संचालक धनंजय केळकर यांनी त्याबाबतचे परिपत्रक काढलेे आहे. स्वाईन फ्लू, कोरोना व आताच होऊन गेलेला जीबीएस वा गियाबारी सिंड्रोम या सर्व साथींच्या आजारात रुग्णालयाने निस्पृहपणे काम केले. कालचा दिवस दीनानाथ रूग्णालयाच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता, असे नमूद करून डॉ. केळकर यांनी म्हटले आहे की, आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, संतप्त मोर्चातील एका समुहाने अधिकार्‍याच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी घैसास यांच्या आई वडिलांच्या रूग्णालयावर हल्ला केला.   
 
एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेर्‍यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणार्‍यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे! हेचि काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची शुक्रवारी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले. 
 
झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्युमागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत. महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेे असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले, याकडे लक्ष वेधून डॉ. केळकर यांनी म्हटले आहे की, जेव्हा रूग्णालय सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जात नसे; परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले. तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास सुरुवात झाली. कालच्या घटनेने आम्ही पुन्हा आढावा घेतला. व यापुढे दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही रुग्णाकडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो. वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम घेणार नाही. असा विश्वस्त व व्यवस्थापणाने ठराव केला. शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच. परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
 
कमिशन प्रॅक्टिसला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्रीकडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, रुग्णांकडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली. दिवसेंदिवस दीनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली व आजमितिला ८५ हजार आंतररुग्ण दरवर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण आणि तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. यामध्ये गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्रय रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला धर्मादाय आयुक्ताला पूर्ण यादी पुरवली जाते, असे पत्रकात म्हटले आहे. 

Related Articles