नोकरीचे आमिष दाखवून फसवणार्‍यास अटक   

पुणे : पोलिस उपनिरीक्षक म्हणून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका तरूणाकडून १० लाख रुपये त्याला फसवणार्‍या भामट्याला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. महादेव बाबुराव दराडे (वय ३५, रा. वाकड) असे या भामट्याचे नाव आहे. याबाबत अहिल्यानगरमधील काष्टी येथील २२ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हा प्रकार १ मे २०२२ ते ४ माचे २०२५ दरम्यान घडला. दरम्यान, या भामट्याने आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
 
दराडे हा मुळचा धाराशिव येथील असून, सध्या तो वाकड येथे रहात आहे. तो रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतो. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित कामे लोकांना करुन देत असतो. तक्रारदार तरुणाला तो पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भेटला. त्याने या तरुणाला पोलिस उपनिरीक्षक म्हणून नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. त्या कामासाठी वेळोवेळी त्याच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्याला नोकरीला न लावता फसवणूक केली.गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर महादेव दराडे याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचून शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रसाळ याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles