तक्रार देण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्‍यांवर गुन्हा   

पुणे : बुलेट आणि मोटार विक्री करणार्‍या कंपन्याविरोधात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करणार असल्याची धमकी देऊन २० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.विजय म्हस्के आणि अविनाश रमेश रोकडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी, एका वाहन विक्री करणार्‍या कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी तक्रार दिली.
 
तक्रारदार यांच्या मावस भावाची वाहन विक्री करणारी कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे मोटार विक्री करण्याचे दालन वारजे भागात आहे. या दालनातील सर्व जबाबदारी पाहण्याचे काम त्यांच्याकडे आहे. आरोपी विजय म्हस्के २०१७ मध्ये संबंधित कंपनीत कामाला होता. सहा महिने काम केल्यानंतर त्याने काम सोडून दिले होते.  त्यानंतर म्हस्केने ११ मार्च रोजी व्यवस्थापाकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. कंपनीच्या कामासंदर्भात भेटायचे आहे, असे सांगून त्याने त्यांना मार्केट यार्ड भागातील एका हॉटेलमध्ये बोलाविले.
 
वारजे भागातील कंपनीच्या सर्व्हिस सेंटर पर्यावरणविषयक निकषांची पूर्तता केली नाही. कंपनीकडे याबाबतचे प्रमाणपत्रही नाही. याबाबत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार देण्यात येणार आहे, तसेच याबाबत देण्यात आलेली नोटीस त्याने व्यवस्थापकाला दाखविली. याप्रकरणाचा पाठपुरावा मी करणार आहे, असे म्हस्केने त्यांना सांगितले. त्यानंतर व्यवस्थापकाने म्हस्केला समजावून सांगितले. ‘तू कंपनीत काम केले आहे. विनाकारण त्रास देणे योग्य नाही,’ असे त्यांनी म्हस्केला सांगितले. त्यानंतर ‘मी नोटीस मागे घेतो, त्यासाठी काही तरी द्यावे लागेल’, असे म्हस्केने त्यांना सांगितले.
 
म्हस्केने त्यांना पुन्हा भेटायला बोलावले. ’याप्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. मंत्रालयात तक्रार देऊन तुमची कंपनी बंद पाडतो. पाठपुरावा न करण्यासाठी २० लाख रुपये द्यावे लागतील,’ असे त्याने सांगितले. म्हस्केच्या सांगण्यावरुन अविनाश रोकडेने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. नोटीस मागे घ्यायची असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. म्हस्के आणि रोकडे यांच्या धमक्यांमुळे तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles