सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस पाटील भवन उभारणार   

राज्यमंत्री भोयर यांची घोषणा 

पिंपरी : पोलिस पाटील गावात सलोखा राखण्यासोबतच पोलिस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिस पाटील भवन उभारले जाणार असल्याची घोषणा गृह ग्रामीण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शनिवारी केले.
 
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाद्वारे भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श पोलिस पाटील पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, बाबाजी काळे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, खेडचे कृषी उपबाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेचे संस्थापक भिकाजी पाटील, अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण साळुंके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, खजिनदार निळकंठ थोरात, महिला आघाडीच्या तृप्ती मांडेकर आदिंसह राज्यभरातील विविध पदाधिकार्‍यांसह पोलिस पाटील उपस्थित होते.राज्यमंत्री भोयर म्हणाले, पोलिस पाटलांचे भरघोस मानधन वाढविण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पोलिस पाटील यांनी कोणत्याही समस्या घेऊन मंत्रीमंडळात आल्यास त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मी मंत्री म्हणून शेवटपर्यंत पोलिस पाटील संघटनेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहीन, असे आश्वासन त्यांनी दिले.
 
यावेळी राज्यभारातून आलेल्या आदर्श पोलिस पाटील यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाद्वारे सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये पोलिस पाटलांची वयोमर्यादा ६० वरून ६५ करणे, पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस पाटील भवन उभारणे, निवृत्तीनंतर दहा लाख अथवा पाच हजार रुपये निवृती वेतन, पोलिस पाटलांचे दर दहा वर्षांनी होणारे नुतनीकरण बंद करणे, शासनाकडून पोलिस पाटलांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सेवा देणे, पोलिस पाटलांच्या रिक्त जागा तातडीने भरणे, पोलिस पाटलांचे प्रलंबित असलेले भत्ते तातडीने देणे, शेजारच्या गावचा भार सांभाळणार्‍या पोलिस पाटलांना अतिरिक्त मनधन देणे या मागण्या करण्यात आल्या. या मागण्या राज्य शासनाद्वारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गृह ग्रामीण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.

Related Articles